मी शारदाबाई पवारांची नात आहे, तुम्हाला काय वाटलं? सुप्रिया सुळे कडाडल्या
Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या प्रचारात महायुतीसह महाविकास आघाडीकडून वार प्रतिवार सुरू आहेत. राज्यात अनेक ठिकाणी उमेदवार ठरले नसले तरी काही ठिकाणी प्रचाराला जोरदार सुरूवात झालीय. आज बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर नाव न घेता चांगलाच प्रहार केलाय. त्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत बोलत होत्या.
शारदाबाईंच नाव घेताच जल्लोष
पक्ष गेला, चिन्ह गेलं त्यानंतर सर्व विरोधकांना वाटलं होत मी रडत बसणार. मात्र, एक लक्षात ठेवा, मी शारदाबाई पवारांची नात आहे. त्यामुळे मी रडणारी नाही तर लढणारी आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी शारदाबाई पवार यांच्या नावाचा उल्लेख करताच उपस्थितांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी व्यासपीठावर शरद पवारही उपस्थित होते.
शाहू-फुले-आंबेडकर, जितेंगे धंगेकर
बारामती लोकसभा मतदार संघातून आजच सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी त्यांनी आपला विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करत, आपल्याला मोदींच्या विकासाला साथ द्यायची आहे असं आवाहनही उपस्थितांना केलं आहे. तर, दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी मोदींसह विरोधकांवर नाव न घेता चांगलाच हमला चढवला. तसंच, शाहू-फुले-आंबेडकर, जितेंगे धंगेकर. अशी घोषणाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली.
तशी देशाची सध्या परिस्थिती नाही
उमेदवारांच्या नामनिर्देशानंतर महाविकास आघाडीच्या या सभेत अनेक नेत्यांची भाषणं झाली. त्यामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी कायम म्हणत असतात की, भारताची अर्थ व्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना विकासाची गती होती, तशी गती कायम राहिली असती तर आज आपण तिसऱ्या क्रमांकावर असतो. मात्र, तशी देशाची सध्या परिस्थिती नाही. तसंच, हे आम्ही सांगत नसून देशातील नामांकित संस्थांचा अहवाल सांगतो, असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या सभेत जोरदार विरोधकांवर टीका केली.