तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची रुग्णालयांना नोटीस…

Pune News : तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेऊ नये, अशी नोटीस पुणे महानगरपालिकेकडून शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना बजावलीयं. दरम्यान, पुण्यात गर्भवती महिलेवर पैशांअभावी (Deenanath Mangeshkar Hospital) उपचार न केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरुन गदारोळ झाल्यानंतर अखेर महापालिकेने नोटीस धाडलीयं.
रुग्णावर पहिल्यांदा उपचार करण्यास प्राधान्य द्यावे, असे महापालिकेने रुग्णालयांना पाठविलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तातडीचे उपचार न केल्याने तनिषा भिसे या गरोदर मातेच्या मृत्यूची घटना नुकतीच घडली. पैशांच्या मागणीवरून रुग्णाचा जीव गेल्याच्या या घटनेनंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी रुग्णालयाच्याविरुद्ध तीव्र आंदोलने केली.
Pravin Tarde Song : शिवरायांच्या लेकरांनो नीट ऐका! ‘बोल मराठी’तून प्रविण तरडेची नवीन इनिंग
दरम्यान, रुग्णालयाने या प्रकरणाची दखल घेत तातडीच्या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांकडून अनामत रक्कम न घेण्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर पुणे महापालिकेला अखेर जाग आली आणि महापालिकेने शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.
तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना ताटकळत ठेवून रुग्णालये अनामत रक्कम भरण्यासाठी रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करतात. उपचार वेळेत न मिळाल्यामुळे रुग्णांना आपला जीव गमावण्याची वेळ येते. तनिषा भिसे यांच्या मृत्यूच्या घटनेनंतर या प्रकरणातील गांभीर्य अधिक स्पष्ट झाले.
त्यामुळे महापालिकेने खासगी रुग्णालयांना अनामत रक्कम न घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. तातडीच्या उपचारांसाठी नातेवाईक त्यांच्या रुग्णांना घेऊन येतात, त्यावेळी त्यांच्याकडून अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नये. रुग्णावर तातडीने उपचार करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीना बोराडे यांनी सांगितले.