FDA ची मोठी कारवाई! मॅकडोनाल्ड्ससह 13 आस्थापनांचे परवाने निलंबित; तपासणीत गंभीर त्रुटी उघड

अन्नपदार्थ योग्य पद्धतीने डीफ्रॉस्ट केले जात नसल्याचं तसेच स्वयंपाकघराचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसल्याने कीटक व दूषित घटक आत जाण्याची शक्यता असल्याचे तपासणीत समोर आलं.

FDA...

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील हॉटेल व्यवसाय करणाऱ्या अनेक आस्थापनांवर मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं गंभीर उल्लंघन आढळून आल्याने दक्षिण मुंबईतील बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि कोलाबा येथील (McDonald) आउटलेटसह अनेक आस्थापनांचे हॉटेल व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मे महिन्यात पदभार स्वीकारल्यानंतर तपासणी आणि कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विशेष मोहिमेत राज्यातील 89 हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी 71 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली, तर 13 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून दूध व दुग्धजन्य पदार्थांसह इतर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातही कारवाई केली. या कारवाईत 3,348 किलो दुग्धजन्य पदार्थ व पावडर तसेच 902 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले. प्रतिबंधित अन्नपदार्थ, पान मसाला आणि गुटख्याची विक्री, वितरण व वाहतूक केल्याप्रकरणी 12 गुन्हे दाखल करून 18 जणांना अटक करण्यात आली. 19 ऑगस्ट रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबच्या स्वयंपाकघराची तपासणी करण्यात आली असता 47 टक्के नियमभंग आढळून आला. स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर जिवंत माश्या आणि मृत झुरळे आढळली. छताचा रंग आणि प्लास्टर निघालेले होते, तर अन्नपदार्थांच्या जवळ धुण्याची पावडर व इतर रसायने ठेवण्यात आली होती. अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवलेले होते. मांसाहारी पदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे रेफ्रिजरेटरही अस्वच्छ आढळले. अन्नपदार्थ योग्य पद्धतीने डीफ्रॉस्ट केले जात नसल्याचे तसेच स्वयंपाकघराचा दरवाजा व्यवस्थित बंद होत नसल्याने कीटक व दूषित घटक आत जाण्याची शक्यता असल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे निलंबनाच्या कालावधीत क्लबला अन्नाची खरेदी, विक्री आणि वितरण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

हायकोर्टाचा तुकाराम मुंढेंच्या एफडीएला दणका; दुकान बंद ठेवल्याप्रकरणी पाच लाखांचा दंड

दक्षिण मुंबईतील कोलाबा येथील मेट्रो हाऊसमधील (McDonald’s Family Restaurant kiosk) वरही FDA ने कारवाई केली. (Hardcastle Restaurants Pvt Ltd) या कंपनीकडून चालवण्यात येणाऱ्या या आउटलेटच्या 19 ऑगस्ट रोजी झालेल्या फेरतपासणीत यापूर्वीच्या सुधारणा नोटीसमध्ये नमूद केलेल्या 20 पैकी 18 त्रुटी दूर करण्यात आलेल्या नसल्याचे आढळले. रेफ्रिजरेशन उपकरणांचे कॅलिब्रेशन झालेले नव्हते, जिवंत झुरळे आढळली, कीटक पकडण्यासाठी आवश्यक सापळे नव्हते आणि स्वयंपाकघराच्या जमिनीवर कुजलेला अन्नकचरा पडलेला होता. स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे कापडही अस्वच्छ होते, तर संरक्षक कवच नसलेल्या दिव्यांवर धुळीचा थर जमा झाला होता. कर्मचारी अस्वच्छ पादत्राणे आणि मळकट स्वच्छता कापड हाताळल्यानंतर हात न धुता थेट खाण्यास तयार असलेल्या अन्नपदार्थांना हाताळत असल्याचेही तपासणीत आढळले. आउटलेटने 12 ऑगस्ट रोजी 148 पानांचा अनुपालन अहवाल सादर केला होता. मात्र फेरतपासणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी कायम असल्याचे FDA ने सांगितले. ग्राहकांना दाखवण्यात येणाऱ्या माहितीत वास्तविक चीज आणि पनीर वापरण्याचा दावा असताना (GO Cheese SAUCE) नावाच्या प्रक्रिया केलेल्या नॉन-डेअरी किंवा अॅनालॉग पदार्थाच्या कथित वापराबाबतही अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला.

मुंबईतील इतर आस्थापनांवरही FDA ने कारवाई केली आहे. मालाडमधील (Novaara Restaurant) च्या फेरतपासणीत यापूर्वी नमूद केलेल्या 25 गंभीर त्रुटींपैकी 14 त्रुटी कायम असल्याचे आढळले. जुन्या आणि अन्न सुरक्षा मानकांशी विसंगत स्वयंपाकघरातील उपकरणे, ड्रेनेज लाईनमध्ये ग्रीस, झुरळांसाठी सापळ्यांचा अभाव तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या नोंदी अपूर्ण असल्याचे समोर आले. नरिमन पॉइंट येथील (Status Restaurant) वर ग्राहकाच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यात आली. एका कर्मचाऱ्याने स्वच्छ अन्नाची भांडी असलेल्या ठिकाणी थेट चेहरा धुतल्याने सांडपाणी त्या भांड्यांवर उडाल्याचे आढळले. याशिवाय वैयक्तिक सुरक्षात्मक साधनांचा अपुरा वापर, अस्वच्छ भांडी, साचलेले पाणी, ग्रीस आणि तेलाचे थर, गंज आणि अन्नकचरा अशा त्रुटीही आढळल्या. (Khar Gymkhana) चा नोंदणी दाखलाही निलंबित करण्यात आला. अन्न साठवणुकीतील त्रुटी, स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कच्चे आणि तयार अन्न वेगळे न ठेवणे, भांडी धुण्यासाठी गरम पाण्याची सुविधा नसणे आणि गोठवलेले पदार्थ योग्य पद्धतीने डीफ्रॉस्ट न करणे अशा त्रुटी आढळल्या. (Bajrang Sweet Mart) आणि (ASM Hotels and Hospitality Services Pvt Ltd) यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

नवी मुंबईतील महापे परिसरातील भास्कर डेअरी आणि पी.के. डेअरीवरही FDA ने कारवाई केली. भास्कर डेअरीतून स्किम्ड मिल्क पावडर व मीडियम फॅट पावडरसह एकूण 468 किलो दुग्धजन्य पदार्थांचा साठा, तर पी.के. डेअरीतून 687 लिटर दूध जप्त करण्यात आले. दरम्यान, बीड जिल्ह्यात दूध भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरविरोधात FDA आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 1,600 किलो व्हे पावडरचा साठा जप्त केला. हा साठा वाहनातून वाहतूक केला जात असताना कारवाई करण्यात आली असून, त्याची अंदाजे किंमत 2,69,600 रुपये असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. मुंबईबाहेरही FDA ची कारवाई सुरूच असून नागपूरमधील (Du Brothers Shawarma), नाशिकमधील (Avanti Snacks) आणि अमरावतीतील (Pintu Yadav Sweets) यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि परभणी येथील (Chhappan Bhog Thali Restaurant and Banquet Hall), (MHARO Gayatri Mewad Pvt Ltd) आणि (Star Bakery) यांच्यावरही स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

पुणे विभागात 17 ते 20 ऑगस्टदरम्यान (Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra) मोहिमेअंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मुळशी येथील (Baba’s Kitchen), (Ambrosios), हिंजवडी येथील (Shrinath Food Corner) आणि बावधन येथील (Sapphire Foods) संचालित (KFC) आउटलेटसह 5 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. (Baba’s Kitchen) मध्ये अनधिकृत खाद्यरंग आणि मोठ्या प्रमाणावर शिळे अन्न आढळले. (Ambrosios) मध्ये अस्वच्छता आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. (KFC) च्या आउटलेटमध्ये अन्न साठवणुकीच्या व्यवस्थेत त्रुटी असून, साठवणूक सुविधेला (FSSAI) परवान्यानुसार आवश्यक मंजुरी नसल्याचे आढळले. कोल्ड स्टोरेजची वातानुकूलन यंत्रणा बिघडल्याने अन्नाच्या डब्यांवर पाणी गळणे आणि बर्फ साचल्याचेही आढळले. काही अन्नपदार्थांचे बॉक्स थेट जमिनीवर आणि भिंतीलगत ठेवण्यात आले होते. पुणे विभागात पुण्यासह सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश होतो.

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhappan Bhog Thali Restaurant and Banquet Hall) वरही अचानक तपासणी करून कारवाई करण्यात आली. FDA चे अन्न विभागाचे संयुक्त आयुक्त श्रीकांत करकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्टॉरंटमध्ये वापरण्यासाठी ठेवलेले ज्वारी आणि बाजरीचे पीठ किड्यांनी बाधित झालेले आढळले. कर्मचाऱ्यांनी हे किडे हाताने काढून पीठ वापरणार असल्याचे सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. अन्नधान्य आणि पीठ दीर्घकाळ साठवून ठेवल्यास ओलावा निर्माण होऊन बुरशी आणि किड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे अन्नाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, असा इशारा FDA ने दिला. अन्नपदार्थ, पॅकेजिंग साहित्य, रसायने आणि कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक साहित्य यांच्यासाठी स्वतंत्र साठवण व्यवस्था नव्हती. रेफ्रिजरेटर आणि फ्रीजरमध्ये ठेवलेले अन्न योग्य पद्धतीने साठवलेले किंवा लेबल केलेले नव्हते. त्यामुळे क्रॉस-कंटॅमिनेशन, रासायनिक दूषितता आणि कालबाह्य पदार्थ वापरण्याचा धोका निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी केल्याच्या नोंदीही रेस्टॉरंटकडे नव्हत्या. पुणे विभागातील आणखी 5 आस्थापनांवर संशयित अन्न भेसळीप्रकरणी नियामक कारवाई सुरू करण्यात आली असून, महाराष्ट्रभर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यालगतची खाद्य आस्थापने आणि मोठ्या खाद्यसाखळ्यांची तपासणी अधिक तीव्र करण्याचा FDA चा प्रयत्न सुरू आहे.

follow us