भारतीय संविधानाने दिलेले अधिकारही महिलांना पूर्णपणे मिळत नाहीत; पोलीस व्यवस्थेवर वैशाली माने यांचा गंभीर आरोप
महिला अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Vaishali Mane’s serious allegations against the police system : राज्य पोलीस दलातील बदल्यांच्या राजकारणावर आणि महिला अधिकाऱ्यांवरील कथित भेदभावाच्या मुद्द्यावरून सीआयडीच्या पोलीस अधीक्षक वैशाली माने यांनी पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका मांडली आहे. दोन दिवसांपूर्वी माध्यमांसमोर बदल्यांमधील अन्याय आणि महिला अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले.
वैशाली माने म्हणाल्या की, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे केवळ त्यांच्या वैयक्तिक बदलीशी संबंधित नाहीत, तर संपूर्ण पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या भेदभावाशी संबंधित आहेत. माझी तक्रार आजही कायम आहे. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा मुद्दा मांडलेला आहे. त्यांनी याची योग्य दखल घ्यावी, अशी माझी अपेक्षा आहे. वरिष्ठांनी मला चर्चेसाठी बोलावले आहे. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर मी पुन्हा माझी भूमिका मांडेन, असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी पोलीस महासंचालकांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. मला वैयक्तिकरित्या कोणताही त्रास नाही. माझा मुद्दा माझ्या पोस्टिंगचा नाही. मला माझ्या विभागाचा आणि समाजातील महिलांचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो. महिला अधिकाऱ्यांना आणि समाजातील महिलांना कोणत्या प्रकारच्या भेदभावाला सामोरे जावे लागते, हा माझा खरा मुद्दा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्याशिवाय आयपीएल यशस्वी झाली नसती; शशी थरूरांपासून स्क्रिप्टेड वादांपर्यंत ललित मोदींचे खळबळजनक दावे
मी पोस्टिंगसाठी हे बोलत नाही. साईड पोस्टिंगवरही मी काम करण्यास तयार आहे. मात्र स्त्री म्हणून आम्हाला काय वाटते, आमच्या भावना काय आहेत, हेही व्यवस्थेने समजून घेणे गरजेचे आहे. या समाजात आमचेही अस्तित्व आहे. आमच्या भावना आणि अडचणींचा विचार व्हावा, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे माने यांनी सांगितले.
महिला अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून न पाहता संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतीय संविधानाने महिलांना समानतेचा आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक वेळा हे अधिकार महिलांना पूर्णपणे मिळताना दिसत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका अधिकाऱ्याचा नसून संपूर्ण व्यवस्थेत महिलांना मिळणाऱ्या वागणुकीचा आहे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, वैशाली माने यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे राज्य पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात आणि महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारींवर कोणती ठोस पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.