टी-20 वर्ल्ड कप 2026 – दुसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का, अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल

भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. संघाचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 15

Big blow to Indian team, Abhishek Sharma admitted to hospital : टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारतीय संघ आपला दुसरा सामना गुरुवारी (12फेब्रुवारी) खेळणार आहे. मात्र या सामन्याआधीच भारतीय संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. संघाचा विस्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गामुळे त्रस्त असून त्याची प्रकृती खालावल्याने त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेविरुद्ध शनिवारी (7 फेब्रुवारी) मुंबईत झालेल्या सामन्यापूर्वीपासूनच अभिषेक आजारी होता. मात्र सामन्यानंतर त्याची तब्येत आणखी बिघडल्याचे समजते.

मुंबईत असतानाच अभिषेकला ताप आला होता. त्यामुळे तात्काळ उपचार म्हणून त्याला ड्रिप्स देण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीत दाखल झाल्यावरही त्याने मंगळवारी (10 फेब्रुवारी) झालेल्या भारतीय संघाच्या पहिल्या सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता. मात्र याबाबत अद्याप भारतीय क्रिकेट संघाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या संघ व्यवस्थापनाकडून केवळ अभिषेकला पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले आहे.भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले, “अभिषेकला अद्याप पोटात दुखत आहे. मात्र आम्हाला आशा आहे की तो दोन दिवसांत बरा होईल आणि सामन्यासाठी उपलब्ध असेल.”

मोदींनी नक्की काय केले की, ज्यामुळे महाराष्ट्र… भाजपच्या यशावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

दरम्यान, अमेरिकेविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात अभिषेकला अपेक्षित सुरुवात करता आली नव्हती. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरलेला दिसला नव्हता, तसेच ड्रेसिंग रूममध्येही तो उपस्थित नव्हता. त्याच्या जागी संजू सॅमसनने बदली क्षेत्ररक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. तर कुलदीप यादवसोबत क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप पाणी देताना दिसले होते.

या सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदर बंगळुरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीनंतर तंदुरुस्ती मिळवत होता, तर जसप्रीत बुमराहही पहिल्या सामन्यापूर्वी आजारी होता. मात्र बुमराहने सामना खेळला होता. आता जर अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्ध दिल्लीत होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध नसेल, तर संजू सॅमसनला सलामीवीर म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संजूने भारतीय संघाच्या सराव सत्रात सक्रिय सहभाग घेतला होता.

follow us