तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा लॉर्ड्समध्ये 22 धावांनी विजय; जडेजाची झुंज अपयशी

ENG vs IND : लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने सामन्यातील पाचव्या दिवशी 14 जुलैला टीम इंडियावर 22 धावांनी मात केली आहे. (IND) इंग्लंडने यासह या मालिकेतील दुसरा विजय मिळवला आहे. इंग्लंडने टीम इंडियासमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले.
सामन्यात केएल राहुल याच्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडसमोर संघर्ष केला. अखेरच्या क्षणी नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या तिघांनीही रवींद्र जडेजाला चांगली साथ दिली. मात्र, टीम इंडिया विजयी धावांपर्यंत पोहचण्यात अपयशी ठरली. इंग्लंडने भारताला दुसऱ्या डावात 74.5 ओव्हरमध्ये 170 धावांवर ऑलआऊट केलं आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्या डावात जो रुट याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर ऑलआऊट 387 रन्स केल्या.
यानिक सिनरने जिंकला विम्बल्डन 2025चा किताब, मिळाले कोटींचे बक्षीस
प्रत्युत्तरात भारतानेही केएल राहुलच्या शंभरच्या मदतीने इंग्लंड इतक्याच 387 धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 1 ओव्हरमध्ये 2 धावा केल्या. इंग्लंडच्या सलामी जोडीने वेळकाढूपणा केल्याने या शेवटच्या ओव्हरमध्ये फुल राडा पाहायला मिळाला. कर्णधार शुबमन गिल आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी इंग्लंडच्या सलामी जोडीला चांगलंच सुनावलं. त्यामुळे चौथ्या दिवशी काय होतं? याची प्रतिक्षा चाहत्यांना होती.
भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवशी अप्रतिम सुरुवात केली. मोहम्मद सिराज याने इंग्लंडला पहिले 2 झटके दिले. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप या दोघांनी 1-1 विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. वॉशिंग्टन सुंदर याने नावाप्रमाणे सुंदर कामगिरी करत इंग्लंडच्या चौघांना तंबूत पाठवलं. तर जसप्रीत बुमराह याने 2 विकेट्स घेतल्या. भारताने अशाप्रकारे इंग्लंडला 192 धावांवर रोखलं.