भारताविरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकल्यानंतर आयसीसीने पाकिस्तानला सुनावले खडेबोल
आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इशारा देत म्हटले आहे की, 'या निर्णयाचे पाकिस्तानमधील क्रिकेटवर दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम होऊ शकतात.
ICC reprimands Pakistan for boycotting match against India : येत्या 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला सुरूवात होत आहे. मात्र स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच पाकिस्तान सरकारच्या एका निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली असली, तरी 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या ग्रुप सतेज सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या या भूमिकेनंतर आयसीसीची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयावर आयसीसीने आपली स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली आहे. आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘2026 आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कपमध्ये निवडकपणे सहभागी होण्यासाठी पाकिस्तान सरकारने त्यांच्या राष्ट्रीय संघाला निर्देश देण्याच्या निर्णयाची आयसीसीने नोंद घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अधिकृत संवादाची आम्ही वाट पाहत आहोत.’ आयसीसीने पुढे स्पष्ट केले की, ‘निवडक सहभागाची भूमिका ही जागतिक क्रीडा स्पर्धांच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत आहे. पात्र ठरलेले सर्व संघ ठरावीक वेळापत्रकानुसार आणि समान अटींवर स्पर्धा करतील, हीच अपेक्षा असते.’
हिंजवडी आयटी पार्कमध्ये धावणार मेट्रो; 2 तासांचा प्रवास होणार अवघ्या 25 मिनिटांत
आयसीसी स्पर्धा क्रीडा अखंडता, स्पर्धात्मकता, सातत्य आणि निष्पक्षतेवर आधारित असतात. निवडक सामन्यांपासून दूर राहण्यामुळे स्पर्धेची भावना आणि पावित्र्य बाधित होते, असेही आयसीसीने नमूद केले आहे. ‘राष्ट्रीय धोरणांबाबत सरकारच्या भूमिकेचा आयसीसी आदर करते, मात्र हा निर्णय जागतिक क्रिकेटसाठी किंवा जगभरातील चाहत्यांच्या, त्यात पाकिस्तानमधील लाखो क्रिकेटप्रेमींच्या हिताचा नाही,’ असेही आयसीसीने स्पष्टपणे सांगितले.
याशिवाय आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला इशारा देत म्हटले आहे की, ‘या निर्णयाचे पाकिस्तानमधील क्रिकेटवर दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम होऊ शकतात. जागतिक क्रिकेट परिसंस्थेचा पीसीबी हा सदस्य आणि लाभार्थी असल्याने त्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.’ शेवटी आयसीसीने स्पष्ट केलं की, टी-20 वर्ल्ड कप यशस्वीपणे पार पाडणे ही आयसीसीसह सर्व सदस्य संघांची सामूहिक जबाबदारी आहे. पीसीबीने सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करणारा परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढावा, अशी अपेक्षा आयसीसीने व्यक्त केली आहे.
