कसोटीत टीम इंडिया संकटात! विजयासाठी 100 धावांची गरज
ढाका : शेरे बांगला स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसा अखेर टीम इंडियानं चार विकेट गमावून 45 धावा केल्या आहेत. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 100 रणांची गरज आहे. बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली. शुभमन गिल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली हे झटपट आऊट झाल्यानं टीम इंडिया अत्यंत नाजूक स्थितीत आहे. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराजनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, शाकीब अल हसनला एक विकेट मिळाली.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवसा अखेर बांगलादेशचा संघ 80 रणांनी पिछाडीवर होता. त्यानंतर दिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात टीम इंडियानं बांगलादेशच्या संघाला 231 रणांवर रोखलं. लिटन दास आणि झाकीर हसन यांनी शानदार अर्धशतक झळकावले. दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत भारताला मजबूत स्थितीत नेले. हा सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 145 धावांची लक्ष्य मिळालं आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी मात्र कमालीची गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला. यावेळी बांगलादेशसाठी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झूंज दिल्यामुळं बांगलादेश 200 पार रणांवर पोहचवू शकले. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यात उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात तशी जेमतेमचं झाली. सलामीवीर केएल राहूल 10 तर शुभमन गिल 20 धावा करुन माघारी गेले. कोहली आणि पुजारा कमाल करतील असं वाटत होतं पण दोघेही प्रत्येकी 24 धावा करुन आऊट झाले. ज्यानंतर मात्र ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरनं डाव सावरला. दोघांनी दमदार अशी फलंदाजी सुरु ठेवली. पंतने त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फटकेबाजी केली. दोघांनी 150 हून अधिक धावांची भागिदारी केली.
शतकापासून मात्र दोघेही थोडक्यात हुकले. पंत 105 चेंडूत 93 धावा करुन बाद झाला तर श्रेयस अय्यर 105 चेंडूत 87 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर इतर खेळाडू स्वस्तात बाद झाले आणि 314 धावांवर भारताचा डाव आटोपला. बांगलादेशकडून तायजून इस्लाम आणि कर्णधार शाकिबने प्रत्येकी 4 तर तास्किन अहमद आणि मेहदी हसननं प्रत्येकी एक विकेट घेतली.