Ind Vs England : जो संघ जिंकेल टॉस, तोच बनणार बॉस…
टी 20 विश्वचषक स्पर्धेचा दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इंग्लडमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे.
IND VS England : टी 20 विश्वचषक स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना आज मुंबईतील वानखेडे मैदानावर पार होणार आहे. दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इंग्लंड (IND VS England ) यांच्यात होणार आहे. इतिहासाचं पान उघडलं तर भारतासाठी वानखेडे स्टेडियम चांगलं ठरलेलं नाही. टी-20विश्वचषका भोवतीचा उत्साह शिगेला पोहोचला असून न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर, जगाचे लक्ष आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यावर आहे.
भारत दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक आयोजित करत आहे. यापूर्वी 2016 मध्ये भारतात टी-20 विश्वचषक झाला होता. या काळात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रत्येक नॉकआउट सामना जिंकला. 2016 च्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करून न्यूझीलंडचा पराभव केला. त्यानंतर, दुसऱ्या उपांत्य फेरीत, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताचा 7 गडी राखून पराभव केला. अंतिम फेरीत, वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले.
वानखेडे स्टेडियमवर 2023 साली न्यूझीलंडसोबत झालेल्या सामन्यात मिळवलेला विजय सोडून भारताने दोन सामने गमावलेले आहेत. यामध्ये 1987 साली एक दिवसीय विश्वचषक सेमीफायनलचा सामनाही समाविष्ट आहे. त्यावेळी इंग्लडने भारताचा पराभव केला होता. ग्राहम गुचने या सामन्यात 115 धावा केल्या होत्या. गुचच्या धावांमुळे इंग्लडने 254 धावांचा डोंगर केला होता. तर भारतीय संघाने 45.3 षटकांत 219 धावा केल्या होत्या. या सामन्यात मोहम्मद अजहरुद्दीनने 64 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे आजही भारतासमोर तीच परिस्थिती आहे.
यंदाच्या टी 20 स्पर्धेत भारत आणि इंग्लड दोन्ही संघाचा दबदबा दिसून आला आहे. सुर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार तर हैरी ब्रुकचा इंग्लड संघ दोन्ही संघ नाजूक स्थितीत आहेत. या दबावाच्या परिस्थितीत कोणता संघ चांगलं प्रदर्शन करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भारतीय संघाने वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळाडू खेळवले असून फलंदाजीमध्ये अभिषेक शर्माचा चढ-उतार पाहायला मिळालायं. तर गोलंदाजीमध्ये वरुण चक्रवर्तीचा प्रभावही दिसून आलायं. सर्वाधिक चिंता फिल्डींगची असून स्पर्धेत भारतीय संघाने अनेक कॅच सोडल्याचे दिसून आले आहेत.
तिलक – अभिषेक पैकी एक होणार बाहेर? उपांत्य फेरीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाणून घ्या
या परिस्थितीत गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अनेकदा संकटमोचक बनला आहे. जेव्हा सामना हातातून गेला तेव्हा तेव्हा जसप्रीत बुमराहने कव्हर केल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा अर्शदीप सिंहने वाईड यॉर्करने तर हार्दिक पांड्याने स्लोअर बाऊंसरने अनेक विकेट घेतले आहेत. होमस्पीचवर भारतीय संघाची जमेची बाजू असणार आहे. वानखेडे स्टेडियम अनेक भारतीय खेळाडूंसाठी होपस्पीच आहे. कर्णधार सुर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या, जसप्रीत बुमराह, शिवम दुबे आणि ईशान किशन हे खेळाडू या स्टेडियममध्ये खेळले आहेत. सेमी फायनल सामन्याबद्दल इंग्लडचा कर्णधार हैरी ब्रुकने आपलं मत मांडलं असून हैरी म्हणाला, आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही सामन्यातून बाहेर आहोत. टॉप – 7 मध्ये फलंदाजाला मोठा स्कोर बनवावा लागतो किंवा गोलंदाजाचा दिवस चांगला पाहिजे, असं झाल्यास सामन्याची दिशा बदलून जाते, असं हैरीने स्पष्ट केलंय.
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, संजू सैमसन (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कप्तान), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती
इंग्लड संघ :
फिल साल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हैरी ब्रूक (कप्तान), जैकब बेथेल, टॉम बैंटन, सैम करन, विल जैक्स, जेमी ओवरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद
