भारताच्या लेकींची कमाल; टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आफ्रिकेचा धुव्वा उडवत विश्वविजेतेपद

  • Written By: Published:
भारताच्या लेकींची कमाल; टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आफ्रिकेचा धुव्वा उडवत विश्वविजेतेपद

India Women Cricket Team Won U19 T20 World Cup 2025 : 19 वर्षांखालील महिला टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup 2025) फायनलमध्ये भारतीय संघाने (India Women Cricket Team) दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करत विश्वविजेतेपद मिळविले. भारताच्या जोरदार गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 82 धावांत गारद झाला. भारताची सलामीवीर गोंगाडी त्रिशा हिने 44 धावांची खेळी करत सहज सामना जिंकून दिला आहे. भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपला गवसणी घातली आहे.

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय आफ्रिकेच्या अंगलट आला. भारताच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर आफ्रिकेचे फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. आफ्रिकेचा संघ अवघ्या 82 धावांत बाद झाला. भारताकडून त्रिशाने तीन, तर वैष्णवी, आयुषी आणि परुनिका सिसौदिया याने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर शबनम शकील हिने एक विकेट घेतली.

प्रत्युत्तर हे 83 धावांचे लक्ष्य भारताने 12 ओव्हरमध्येच गाठले. या स्पर्धेमधील सर्व सामने जिंकून भारताने एक विक्रम रचलाय. भारतीय संघाने सातही सामने जिंकले आहेत. फायनलमध्ये गोंगाडी त्रिशाने 44 धावांची खेळी व तीन विकेट्स घेतल्या आहेत. तर सानिका हिने नाबाद 26 धावा केल्या. संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणारी त्रिशा ही मालिकावीर आणि सामनावीर ठरली.

त्रिशाने रचला इतिहास
महिलांच्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा इतिहास गोंगाडी त्रिशाने रचलाय. तिने या वर्ल्डकपच्या सात सामन्यांमध्ये 77 च्या सरासरीने 309 धावा काढल्या. तिने भारताच्या श्वेता सहरावत हिचे विक्रम मोडीत काढला. तिने 2023 च्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्ये सात सामन्यांमध्ये 99 च्या सरासरीने 297 धावा केल्या. फायनलमध्येही त्रिशाने 33 चेंडूंमध्ये 44 धावांची नाबाद खेळी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या