टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने सामना जिंकला; आता आव्हान न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियाचं
India vs Bangladesh Test Series : भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश संघाविरुद्ध कानपूरला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे भारताने ही मालिका २-० अशा फरकानेही जिंकली. दुसऱ्या कसोटीत पावसाचे मोठं सावट होते. अडीच दिवस पावसामुळे वाया गेलं होतं. असं असतानाही ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा भाग असल्याने निकाल महत्त्वाचा होता.
अव्वल स्थान भक्कम
अशात भारताने रणनीती बदलली त्यांनी पहिल्या डावात टी-२० स्टाईल फटकेबाजी केली, ज्यामुळे या सामन्याचा निकाल लागणं सोपं गेलं. अखेर हा सामना भारताने जिंकला आणि मालिकाही खिशात घातली. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा भाग असल्याने मालिकेच्या निकालाचा परिणाम टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलवरही झाला आहे. भारताने ही मालिका जिंकल्याने पाँइंट्स टेबलमधील आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे.
मोठी बातमी! येस बँकेच्या कंपनीला मोठा झटका; बँक खाती गोठवण्याचे कोर्टाचे आदेश, काय आहे प्रकरण
ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातच तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून तिथे ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतही जर भारताची कामगिरी चांगली राहिली, तर भारत तिसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळताना दिसेल. दरम्यान सध्या भारतापाठोपाठ पाँइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकलेत आणि ३ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांची सरासरी टक्केवारी ६२.५० अशी आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक टक्कर श्रीलंका देऊ शकतात. त्यांनी ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकलेत, तर ४ सामने पराभूत झाले आहेत. त्यांची सरासरी टक्केवारी ५५.५६ अशी आहे. त्यामुळे श्रीलंका सध्या पाँइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बांगलादेशला मात्र भारताविरूद्धच्या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. बांगलादेश आता पाचवरुन सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. त्यांनी ८ सामन्यांपैकी ३ विजय आणि ५ पराभव स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांची सरासरी टक्केवारी आता ३४.३८ झाली आहे.
या पाँइंट्स टेबलमध्ये ४२.१९ सरासरी टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर इंग्लंड आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची ३८.८९ सरासरी टक्केवारी आहे. सहाव्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. न्यूझीलंडची सरासरी टक्केवारी ३७.५० अशी आहे. पाँइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आहे. आठव्या क्रमांकावर पाकिस्तान असून त्यांची १९.०५ सरासरी टक्केवारी आहे, तर नवव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आहे, ज्यांची सरासरी टक्केवारी १८.५२ आहे.
भारताचा मालिका विजय
भारताचे आता ११ सामन्यांपैकी ८ विजय आणि २ पराभवांसह ९८ पाँइंट्स झाले आहेत, तसेच ७४.२४ सरासरी टक्केवारी आहे. भारताने ही मालिका जिंकल्याने आता भारतासाठी पुढचा मार्ग सोपा आहे. तरी अद्याप त्यांच्यासमोर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांचे आव्हान आहे. दरम्यान, भारताने बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना चेन्नईला खेळला होता. या सामन्यात भारताने २८० धावांनी विजय मिळवला होता. तसेच दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवल्याने आता भारतीय संघाने मालिका २-० ने जिंकून बांगलादेशला व्हाईटवॉश दिला आहे.