World Test Championship Final 2023: गिल, जडेजा आणि रहाणेसह हे खेळाडू WTC फायनलसाठी लंडनमध्ये दाखल

World Test Championship Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 साठी भारतीय संघाची शेवटची तुकडीही लंडनला पोहोचली आहे. यामध्ये शुभमन गिल, रवींद्र जडेजा, अजिक्य रहाणे, केएस भरत आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. आयपीएल 2023 च्या फायनलमुळे या खेळाडूंना लंडनला पोहोचण्यास उशीर झाला होता. 29 मे रोजी, IPL 2023 चा अंतिम सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला.
शुभमन गिल, केएस भरत आणि मोहम्मद शमी हे आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा भाग होते, तर चेन्नई सुपर किंग्जमध्ये रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांचा सहभाग होता. गुरुवारपासून हे खेळाडू सरावाला सुरुवात करतील. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संपूर्ण भारतीय संघासोबत सराव सत्र घेणार आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, सिराज, शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी सराव सुरु केला. कोहली आणि रोहितने फलंदाजीचा अभ्यास केला.
7 जूनपासून सुरू होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ कोणताही सराव सामना खेळणार नाही. संघाने अंतिम सामन्यासाठी पूर्ण तयारी करावी, असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना वाटते. अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि कंपनी इंट्रा स्क्वॉड गेम खेळतील.
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश
टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. याआधी 2021 ला टीम इंडियाचा सामना फायनलमध्ये न्यूझीलंडशी झाला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करत होता आणि रवी शास्त्री संघात मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत होती. यावेळी संघाचे कर्णधारपद रोहित शर्माच्या हाती असून राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, केएस भरत, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, विराट कोहली, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव.
स्टँडबाय खेळाडू – सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि मुकेश कुमार.