भारतविरोधी अफरीदीचं दुबईत जोरदार स्वागत; केरळच्या ‘त्या’ ग्रुपनं मागितली माफी, Video व्हायरल

Kerala Group Host Shahid Afridi in Duabi : पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार शाहीद अफरीदी (Shahid Afridi) सातत्याने भारताविरुद्ध गरळ ओकण्याचं काम करत आहे. त्याने भारतीय सैन्याबाबतीतही (Indian Army) आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भारतात त्याच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एक चीड आणणारी घटना दुबईत घडली. दुबईत या भारतद्वेषी पाकिस्तानीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यावरुन भारतात संताप व्यक्त केला जात आहे. कारण अफरीदीचे स्वागत करणारा ग्रुप केरळचा होता.
दुबईत एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम केरळमधील एका ग्रुपने आयोजित केला होता. यात शाहीद अफरीदीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्याच्याबरोबर आणखी एक माजी खेळाडू उमर गुल देखील होता. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. अफरीदीचं जोरदार स्वागत या ग्रुपने केल्याचे पाहून लोकांची तळपायाची आग मस्तकात गेली. सोशल मीडियावर या ग्रुपला लोकांनी चांगलंच फटकारलं. वाद वाढत असल्याचे लक्षात येताच या ग्रुपने माफी मागितली. तसेच या प्रकाराबाबत एक निवेदनही प्रसिद्ध केलं.
कोणत्या ग्रुपने केला हा उद्योग
25 मे रोजी दुबईत कोचीन युनिव्हर्सिटी बीटेक एलुमनाई असोसिएशनने (CUBAA) एका नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी पाकिस्तान असोसिएशन दुबई सभागृह निश्चित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अफरीदी आणि उमर गुल दोघे आले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. दोघे पाकिस्तानी जेव्हा कार्यक्रमस्थळी येतात तेव्हा उपस्थित लोक टाळ्या वाजवून जोरात ओरडून त्यांचे स्वागत करत असल्याचे व्हिडिओत दिसते.
मोठी बातमी! पाकिस्तानने अख्खं शहरच गमावलं; ‘या’ शहराचा बलूच आर्मीने घेतला कब्जा
याचवेळी येथे उभे असलेले काही लोक बूम बूम असे देखील म्हणताना दिसतात. अफरीदी क्रिकेट जगतात याच नावाने ओळखला जातो. यानंतर अफरीदीने येथे छोटं भाषण केलं. लोकांनीही त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. ज्या ग्रुपने हे सगळं घडवून आणलं त्याचे सदस्य किती निर्लज्ज आहेत असा संताप भारतीयांनी व्यक्त केला. यानंतर या ग्रुपने झाल्या प्रकारावर माफी मागितली.
अखेर केरळच्या ग्रुपकडून खेद व्यक्त
ग्रुपने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आमच्या कार्यक्रमाच्या वेळी तणाव कमी झालेला होता. कमी वेळेत पर्यायी ठिकाण उपलब्ध झाले नाही म्हणून आम्ही पीएडी दुबईत कार्यक्रम पुढे सुरू केला. 25 मे रोजी आमच्या कार्यक्रमात त्याच दिवशी त्या दोन माजी क्रिकेटपटूंनी याच ठिकाणी दौरा केला. 27 मे रोजीच्या गल्फ न्यूजमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.
ज्यावेळी आमचा कार्यक्रम संपत आला होता तेव्हा हे दोन्ही क्रिकेटर अनपेक्षितपणे या ठिकाणी आले. त्यामुळे आम्ही सांगू इच्छितो की आमच्या आयोजन टीमच्या कोणताही सदस्य, अधिकारी किंवा माजी विद्यार्थ्याने त्यांना येथे आमंत्रित केलेलं नव्हतं. या अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे आम्ही खेद व्यक्त करतो. आमच्या कृत्यांमुळे कुणालाही वाईट वाटलं असेल तर आम्हाला याचा खेद आहे. आमचा असा कोणताही उद्देश नव्हता असे स्पष्टीकरण ग्रुपने दिलं आहे.
दहशतवाद आणि संवाद एकत्र नाही, पीओके कधी सोडणार? शाहबाज शरीफकडून चर्चेची इच्छा, भारताचं सडेतोड उत्तर