18 वर्षे, 5 ट्रॉफी अन् आता निवृत्ती.. धोनीच्या IPL ची संपूर्ण कहाणीतील 5 अजय रेकॉर्ड्स…
MS Dhoni आयपीएलमध्ये आता तो 'धोनी... धोनी...' असा निनाद यापुढे मैदानावर दुमदुमणार नाही कारण 'थाला'ने आता खेळाडू म्हणून आपली बॅट कायमची खाली ठेवलीय.
MS Dhoni IPL Retirement & 5 Unbeaten Records : आयपीएलच्या मैदानावर आता कदाचित ‘धोनी… धोनी…’चा तो गजर ऐकायला मिळणार नाही कारण, ज्या नावासाठी चाहते वर्षभर वाट पाहत असत, त्या ‘थाला’ने म्हणजेच महेंद्रसिंग धोनीने आता खेळाडू म्हणून आपली बॅट कायमची खाली ठेवलीय. लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धोनीने अखेर आयपीएलमधील खेळाडू म्हणून आपल्या प्रवासाला पूर्णविराम दिलाय. २००८ मध्ये सुरू झालेला हा प्रवास तब्बल १८ वर्षे चालला. या काळात पाच आयपीएल ट्रॉफी, हजारो धावा आणि अनेक ऐतिहासिक विक्रम धोनीने आपल्या नावावर केले. चेन्नई सुपर किंग्जनेही आता धोनीची नवी भूमिका स्पष्ट केली असून, तो खेळाडू म्हणून नव्हे, तर टीम मेंटॉर म्हणून संघासोबत दिसणार आहे. पाहूयात, कसा होता धोनीचा हा अविस्मरणीय आयपीएल प्रवास…
२००८ मध्ये सुरुवात, चेन्नईशी घट्ट नातं
महेंद्रसिंग धोनी… भारतीय क्रिकेटमधलं असं नाव, ज्याने केवळ सामने जिंकले नाहीत, तर चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनीने चेन्नई सुपर किंग्जसोबत आपल्या प्रवासाला सुरुवात केली. पहिल्याच हंगामात संघाचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आलं. आणि तिथून सुरू झाली एका यशस्वी कर्णधाराची कहाणी.. मात्र, २०१६ आणि २०१७ मध्ये चेन्नई सुपर किंग्जवर बंदी आल्याने धोनीला रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळावं लागलं. पण २०१८ मध्ये चेन्नईने पुनरागमन केलं आणि धोनी पुन्हा एकदा पिवळ्या जर्सीत मैदानात उतरला. चेन्नई आणि धोनीचं नातं पुन्हा एकदा नव्या जोमाने फुललं.
पाच ट्रॉफी… चेन्नईच्या यशाचा शिल्पकार
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. तब्बल पाच वेळा चेन्नईला चॅम्पियन बनवत धोनीने आयपीएलच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे पाच विजेतेपदांचा विक्रम असलेल्या कर्णधारांमध्ये धोनी आणि रोहित यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
धोनीचे पाच विक्रम, जे त्याच्या कारकिर्दीची ओळख ठरले
धोनीच्या नावावर केवळ ट्रॉफींचीच नोंद नाही, तर वैयक्तिक विक्रमांचीही मोठी यादी आहे. पहिला विक्रम… आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा… चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या दोन संघांचं मिळून धोनीने तब्बल २३५ सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. दुसरा विक्रम… कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याचा! २३५ सामन्यांचं नेतृत्व करताना धोनीने १३६ विजय मिळवले. तिसरा विक्रम… यष्टिरक्षक म्हणून सातत्यपूर्ण कामगिरीचा.. विकेटच्या मागे उभं राहून प्रतिस्पर्धी फलंदाजांना अचूकपणे बाद करण्यात धोनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. चौथा विक्रम आयपीएलमध्ये सर्वाधिक ४७ स्टम्पिंग करण्याचा आणि पाचवा विक्रम… चेन्नई सुपर किंग्जला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवण्याचा… हे पाच विजेतेपद धोनीच्या नेतृत्वाची सर्वात मोठी पावती ठरली.
धोनीची ओळख केवळ एका यशस्वी कर्णधारापुरती मर्यादित नव्हती. तो होता एक जबरदस्त फिनिशर! सामन्याचं पारडं कधीही फिरवण्याची क्षमता, शेवटच्या षटकांमधील आक्रमक फलंदाजी, हेलिकॉप्टर शॉट आणि दबावाच्या परिस्थितीतही शांत राहण्याची शैली… या सगळ्यामुळे धोनी चाहत्यांचा लाडका बनला.
आपल्या आयपीएल कारकिर्दीत धोनीने २७८ सामने खेळताना ५ हजार ४३९ धावा केल्या. फलंदाजी, यष्टिरक्षण आणि नेतृत्व… क्रिकेटच्या तिन्ही आघाड्यांवर त्याने आपली छाप उमटवली. म्हणूनच धोनीचं आयपीएलमधील योगदान केवळ आकडेवारीत मोजता येणार नाही.
२०२६ च्या हंगामात धोनी एकाही सामन्यात खेळताना दिसला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पुढील हंगामात तो पुन्हा मैदानात उतरेल, अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, आता खेळाडू म्हणून आयपीएलला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. पण धोनी आणि चेन्नईचं नातं इथे संपणार नाही. चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या माहितीनुसार, धोनी आता टीम मेंटॉरच्या भूमिकेतून संघासोबत राहणार आहे. नव्या खेळाडूंना मार्गदर्शन, संघाच्या रणनीतीत सहभाग आणि आपल्या अनुभवाचा फायदा… अशा नव्या भूमिकेत धोनी दिसणार आहे. म्हणजेच मैदानावर त्याची बॅट दिसणार नसली, तरी डगआऊटमध्ये त्याचा अनुभव आणि मार्गदर्शन चेन्नईसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
१८ वर्षांचा प्रवास… पाच आयपीएल विजेतेपदं… २७८ सामने… ५ हजार ४३९ धावा… आणि कर्णधार, यष्टिरक्षक व फिनिशर म्हणून अनेक अविस्मरणीय क्षण… महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये केवळ विक्रम केले नाहीत, तर एका संघाला ओळख दिली आणि चाहत्यांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं. आता पिवळ्या जर्सीत खेळाडू म्हणून धोनी दिसणार नाही. पण चेन्नईच्या डगआऊटमध्ये त्याची उपस्थिती कायम राहणार आहे. कारण काही खेळाडूंची कारकीर्द संपते… पण त्यांचा प्रभाव संपत नाही आणि महेंद्रसिंग धोनी हे त्याचं सर्वात मोठं मूर्तिमंत उदाहरण आहे…