मोठी बातमी, भारत – पाकिस्तान सामना होणार नाही; PCB ची घोषणा

मोठी बातमी, भारत – पाकिस्तान सामना होणार नाही; PCB ची घोषणा

PCB On WCL : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) स्पर्धा चर्चेत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना पाकिस्तानला पराभव करत दक्षिण आफ्रिकाने जिंकला आहे. तर आता पुन्हा एकदा ही स्पर्धा चर्चेत आली आहे. या स्पर्धेबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यात या स्पर्धेत पाकिस्तान खेळाडू सहभाग घेणार नसल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या हंगामात भारत आणि पाकिस्तानमध्ये या स्पर्धेत सामना होणार नाही. आयोजकांवर पक्षपाती वृत्तीचा पीसीबीकडून आरोप करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

डब्लूसीएलच्या दुसऱ्या हंगामात भारतीय संघाने पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास नकार दिला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय खेळाडू शिखर धवन, युवराज सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी या स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला होता. सेमीफायनलमध्ये भारतविरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार होता मात्र भारताने नकार दिल्याने पाकिस्तानला थेट फायनलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. तर आता पीसीबीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. पीसीबीने या स्पर्धेच्या आयोजकांवर गंभीर आरोप करत पाकिस्तान खेळाडूला या स्पर्धेत भविष्यात सहभाग न घेण्यास सांगितले आहे.

याबाबत पीसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, जाणूनबुजून सामना रद्द करणाऱ्या संघाला गुण देण्याच्या डब्लूसीएलच्या निर्णयाचा पीसीबीने आढावा घेतला असून बोर्डाला आयोजकांचा तो निर्णय पूर्वग्रहाने भरलेला आढळून आला आहे. त्यामुळे भविष्यात बोर्ड खेळाडूंना अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी देऊ शकत नाही जिथे “पक्षपाती राजकारण क्रीडा भावनांवर कब्जा करत आहे आणि जे क्रीडा भावनांचे मूळ सार कमकुवत करत आहे.” तर दुसरीकडे अभिनेता अजय देवगण यांच्या सह-मालकीच्या डब्ल्यूसीएलने भारत- पाकिस्तना लीग सामना रद्द झाल्यानंतर माफी मागितली होती.

डब्ल्यूसीएलने म्हटले होते की, “भावना दुखावल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा माफी मागतो आणि लोकांना आशा आहे की आमचे उद्दिष्ट क्रिकेटप्रेमींना आनंदाचे काही क्षण देणे हे होते हे लोकांना समजेल.”

तर आता पीसीबीने ही माफी हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. भावना दुखावल्याबद्दल’ डब्ल्यूसीएलची माफी हास्यास्पद असली तरी, अनवधानाने मान्य करते की सामने एका विशिष्ट राष्ट्रवादी भावनेला बळी पडल्यामुळे रद्द करण्यात आले. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा समुदायाला चुकीचा संदेश गेला. असं पीसीबीने या निवदेनात म्हटले आहे.

कोथरूड पोलिसांवर तरुणींचा गंभीर आरोप; रूपाली चाकणकरांचा तातडीचा फोन, राज्य महिला आयोगाची तत्काळ दखल

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पीसीबी आता त्यांच्या संघाला अशा कोणत्याही स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देऊ शकत नाही जिथे बाह्य दबावामुळे निष्पक्ष खेळ आणि निष्पक्ष प्रशासनाच्या मूलभूत तत्त्वांशी तडजोड केली जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube