भारताला दुसरे पदक; वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने 60 किलो वजनीगटात जिंकले रौप्य
CWG 2026-या स्पर्धेत मलेशियाच्या बिन कसदान मोहम्मद अनिक याने सुवर्णपदक, तर केनियाच्या जोशुआ अमुंगा म्बोयाने कांस्यपदक पटकावले.
CWG 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 (CWG 2026) मध्ये भारताचा वेटलिफ्टर ऋषिकांत सिंगने 60 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकत इतिहास रचलाय. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे पदक आहे. दोन दिवसांपूर्वी पॅरा पॉवरलिफ्टर झांडू कुमारने हेवीवेट गटात कांस्यपदक जिंकले होते.
या स्पर्धेत मलेशियाच्या बिन कसदान मोहम्मद अनिक याने सुवर्णपदक, तर केनियाच्या जोशुआ अमुंगा म्बोयाने कांस्यपदक पटकावले.
स्नॅच प्रकारात ऋषिकांतने पहिल्याच प्रयत्नात 116 किलो वजन उचलत आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 119 किलो, तर तिसऱ्या प्रयत्नात 121 किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. 121 किलोची सर्वोत्तम उचल करत त्यांनी स्वतःचा वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील स्नॅचचा नवा विक्रम प्रस्थापित केला. स्नॅच फेरीनंतर ऋषिकांत आणि मलेशियाच्या अनिक या दोघांनीही 121 किलो वजन उचलले होते.
क्लीन अँड जर्कमध्ये हुकला सुवर्णाचा क्षण
क्लीन अँड जर्कमध्ये ऋषिकांतने पहिल्याच प्रयत्नात 143 किलो वजन उचलले. मात्र दुसऱ्या प्रयत्नात 148 किलो वजन उचलण्यात त्याला अपयश आले आहे. यानंतर मलेशियाच्या अनिकने 149 किलो वजन यशस्वीरीत्या उचलत आघाडी मजबूत केली. सुवर्णपदक जिंकण्यासाठी ऋषिकांतने शेवटच्या प्रयत्नात 151 किलो वजन उचलणे आवश्यक होते. मात्र हा प्रयत्न अपयशी ठरल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेत ऋषिकांतने 264 किलो (121 + 143) वजन उचलले. तर अनिकने 273 किलो (121 + 152) वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
कोण आहेत ऋषिकांत सिंग?
ऋषिकांत सिंगने लहान वयातच वेटलिफ्टिंगला सुरुवात केली. त्यांनी इम्फाळमधील खुमान लंपाक राष्ट्रीय क्रीडा अकादमी येथे प्रशिक्षण घेतले आहे. 2025च्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत (अहमदाबाद) त्यांनी पुरुषांच्या 60 किलो गटात 271 किलो (120 किलो स्नॅच + 151 किलो क्लीन अँड जर्क) असे वजन उचलत सुवर्णपदक जिंकले होते. कामगिरी दरम्यान त्याने राष्ट्रीय विक्रमही नोंदवत थेट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 साठी पात्रता मिळवली. 2025 जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 11 वे स्थान मिळवले आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 2024 राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या 61 किलो गटात 124 किलो स्नॅच उचलत भारतीय राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती.