S. Sreesanth : बिनशर्त माफीनंतर श्रीसंतला दिलासा; ‘त्या’ प्रकरणात केसीएने उठवली तीन वर्षांची बंदी

S. Sreesanth : भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत नेहमी सोशल मीडियाव चर्चेत असतो. कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी काहींना काही कारणाने

S. Sreesanth

S. Sreesanth : भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत नेहमी सोशल मीडियाव चर्चेत असतो. कधी वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी काहींना काही कारणाने तो सोशल मीडियावर चर्चेत राहतो. तर आता श्रीसंत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. श्रीसंतला आज मोठा दिलासा मिळाला आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने  त्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत श्रीसंतची बिनशर्त माफी स्वीकारली आणि त्याच्यावर लादलेली तीन वर्षांची बंदी उठवली. केसीएविरुद्ध बदनामीकारक विधाने केल्याच्या आरोपावरून ही बंदी गेल्या वर्षी घालण्यात आली होती.

केरळ क्रिकेट असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंदी उठवण्याचा निर्णय त्यांच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निवेदनात नमूद केले आहे की, क्रिकेटपटूने केसीएविरुद्ध केलेल्या विधानांबद्दल व्यक्त केलेली दिलगिरी आणि बिनशर्त माफीनंतर हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी केरळ क्रिकेट लीग (KCL) सामन्यांच्या आधी ही बंदी घालण्यात आली होती.

व्हिज्युअल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या टिप्पण्यांमुळे श्रीसंतला यापूर्वी तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. या टिप्पण्यांमुळे असोसिएशनची बदनामी झाली, असा दावा केसीएने केला होता. श्रीसंतने या शिस्तभंगाच्या कारवाईला तिरुवनंतपुरम मुन्सफ न्यायालयात आव्हान दिले होते मात्र, केसीएच्या म्हणण्यानुसार त्याची याचिका फेटाळण्यात आली होती. तर आता श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनविरुद्ध केलेल्या टिप्पण्यांबद्दल दिलगिरी व्यक्त करत अधिकृतपणे बिनशर्त माफी मागितली.

1 जुलै 2026 रोजी झालेल्या केसीएच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्याच्या माफीनाम्यावर सविस्तर चर्चा झाली. त्याने व्यक्त केलेली बिनशर्त दिलगिरी लक्षात घेऊन, बैठकीत एकमताने बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र असोसिएशनने श्रीसंतला इशारा दिला की, भविष्यात अशा प्रकारच्या वर्तनामुळे कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. बंदी उठवल्यामुळे, श्रीसंत केरळ क्रिकेट लीगच्या तिसऱ्या हंगामात ‘एरीज कोल्लम सेलर्स’ (Aries Kollam Sailors) फ्रँचायझीचा सह-मालक म्हणून काम सुरू ठेवू शकेल. केसीएने मागील KCL हंगामापूर्वी ही बंदी घातली होती.

देशाचे प्रतिनिधित्व करताना तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये श्रीसंतने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. श्रीसंतने 37.59 च्या सरासरीने 87 कसोटी विकेट घेतले असून त्याची सर्वोत्तम कामगिरी एका डावात 5/40 आणि एका सामन्यात 8/99 अशी होती. त्याने चार वेळा एका डावात चार विकेट आणि तीन वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली होती.

विमानतळाच्या मेट्रो मार्गावर शिक्कामोर्तब; तर पौड फाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल !-

एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीसंतने 33.44 च्या सरासरीने 75 विकेट घेतले, ज्यामध्ये 6/55 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सात विकेट घेतले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये, श्रीसंतने 74 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 213 विकेट घेतले (सर्वोत्तम कामगिरी 5/40). याव्यतिरिक्त, त्याने 92 ‘लिस्ट ए’ (List A) सामन्यांत 124 विकेट आणि 65 टी-20 सामन्यांत 54 विकेट घेतले.

follow us