अहिल्यानगरच्या समृद्ध आरडे याची राष्ट्रीय खेलो इंडिया आईस हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. खेळाडू समृद्ध दीपक आरडे याची राष्ट्रीय खेलो इंडिया आईस हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (281)

National Khelo India Ice Hockey Championship : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. येथील खेळाडू समृद्ध दीपक आरडे याची राष्ट्रीय खेलो इंडिया आईस हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी क्रीडा व युवा सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य आणि आईस हॉकी राज्यसंघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय आईस हॉकी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती. ही निवड चाचणी निगडी, पुणे येथे पार पडली. या निवड चाचणीत जिल्ह्याच्या वतीने सहभागी झालेल्या समृद्ध आरडेने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आणि त्याची लेह-लद्दाख येथे होणाऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी अंतिम निवड करण्यात आली.

समृद्ध हा केवळ आईस हॉकीचाच नव्हे तर स्केटिंग खेळातीलही एक गुणवान आणि आशादायी खेळाडू आहे. त्याने यापूर्वी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून तो स्केटिंगचे नियमित प्रशिक्षण घेत असून बुरुडगाव रोड येथील महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या मैदानावर त्याचा सातत्यपूर्ण सराव सुरू आहे. त्याला राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सतीश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. समृद्ध हा सीताराम सारडा विद्यालय (चेअरमन, हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची पतपेढी) येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दीपक आरडे यांचा सुपुत्र आहे.

कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल

समृद्धच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सतीश गायकवाड, ऑलिम्पिक असोसिएशनचे शैलेश गवळी, महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनचे सचिव संजय साठे तसेच महेंद्र हिंगे सर यांनी त्याचे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही समृद्धला दूरध्वनीद्वारे अभिनंदन करत पुढील क्रीडा प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्धच्या या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात तो राज्य व देशपातळीवर अहिल्यानगरचे नाव उज्वल करेल, असा विश्वास क्रीडा प्रेमींमधून व्यक्त केला जात आहे.

follow us