रणजीच्या मैदानात बीडचा जलवा; महाराष्ट्राच्या संघात जिल्ह्यातील 3 खेळाडुंची निवड
Beed Cricket : बीडच्या क्रिकेट विश्वासाठी अभिमानाची बातमी असून तीन खेळाडुंची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली आहे.
मर्यादित सुविधा आणि प्रशिक्षणाच्या अडचणी असतानाही या खेळाडुंनी मेहनत, सातत्य आणि कौशल्याच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशामुळं बीडमधील युवा क्रिकेटपटुंना मोठी प्रेरणा मिळणार आहे. या निवडीबद्दल बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी खेळाडुंचं आणि त्यांच्या पालकांचं अभिनंदन केलं आहे. जिल्ह्यातून एकाच वेळी तीन खेळाडु महाराष्ट्राच्या रणजी संघात पोहोचणं ही अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ करणार आहे. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड हा भारत ‘अ’ संघासोबत 6, 9 आणि 11 ऑक्टोबरला पुदुचेरी इथं ऑस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या अनधिकृत वनडे मालिकेत सहभागी होणार आहे. त्यामुळे 11 ऑक्टोबरच्या सामन्यामुळं तो रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत खेळु शकणार नाही. अर्शिन कुलकर्णी देखील भारत ‘अ’ संघात असल्यानं पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसल्याने पृथ्वी शॉला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सर्व्हिसेसविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यासाठी महाराष्ट्राच्या संघात पृथ्वी शॉ कर्णधार, सचिन धस, वैभव दारकुंडे, दिग्विजय पाटील, अंकित बावणे, हर्षल काटे, सिद्धेश वीर, सौरभ नवले, विकी ओस्तवाल, राजवर्धन भुंगेकर, मुकेश चौधरी, प्रदीप दधे, तनय संघवी, हितेश वाळुंज, ऋषिकेश सोनवणे आणि अथर्व धर्माधिकारी यांचा समावेश आहे. या संघात बीडच्या तीन खेळाडुंना मिळालेली संधी जिल्ह्यातील क्रिकेटपटुंसाठी मोठी प्रेरणादायी ठरणार आहे.