माझी किंमत आणि क्षमता सतत सिद्ध करावी लागत असेल, तर… 2027 वर्ल्ड कपसंदर्भात विराट कोहलीचं स्पष्ट वक्तव्य
जर मला माझी किंमत आणि क्षमता सतत सिद्ध करण्याची वेळ येत असेल, तर ती जागा माझ्यासाठी नाही, असे ठाम शब्दांत विराटने सांगितले.
Virat Kohli’s clear statement : भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असलेल्या विराट कोहली यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्यासह 2017 च्या वनडे विश्वचषकाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. जर मला माझी किंमत आणि क्षमता सतत सिद्ध करण्याची वेळ येत असेल, तर ती जागा माझ्यासाठी नाही, असे ठाम शब्दांत विराटने सांगितले. मात्र, संघाला आपली गरज वाटत असेल आणि आपण योगदान देऊ शकतो, असे वाटत असेल तर कोणत्याही मालिकेसाठी आपण नेहमी तयार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉडकास्टमध्ये बोलताना विराटने आपल्या मानसिकतेबद्दल आणि क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. सध्या आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या विराटने 12 सामन्यांत 484 धावा केल्या असून त्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ वनडे स्वरूपात खेळत आहे.
2024 मध्ये आयसीसी मेन्स टी 20 वर्ल्ड काप 2024 जिंकल्यानंतर विराटने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यापूर्वी दीर्घकाळ खराब फॉर्मशी झुंज दिल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटला देखील अलविदा केला. आता क्रिकेट पॉईंट टेबलमध्ये वनडे सामने कमी प्रमाणात खेळले जात असल्याने 37 वर्षीय विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित संधी मिळत आहेत. त्यामुळे 2027 च्या विश्वचषकात त्याची भूमिका काय असेल, याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे.
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना विराट म्हणाला, माझा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. जर मी ज्या संघाचा किंवा वातावरणाचा भाग आहे, तिथे मो योगदान देऊ शकत असेन आणि संघाला देखील माझ्यावर विश्वास असेल, तर मी नक्की खेळेन. पण जर मला सतत माझी किंमत सिद्ध करावी लागली, तर मी तिथे राहणार नाही. कारण माझ्या तयारीबद्दल मी स्वतःशी पूर्ण प्रामाणिक आहे.
जानकरांचा केला पाळणा; कांदा आंदोलन चिघळल, शेट्टी, राऊत पोलिसांच्या ताब्यात
तो पुढे म्हणाला, मी क्रिकेटकडे अत्यंत प्रामाणिकपणे पाहतो. मी मनापासून मेहनत करतो. देवाने मला क्रिकेट कारकिर्दीत जे काही दिलं, त्याबद्दल मी कायम ऋणी आहे. मैदानावर उतरताना मो प्रत्येक क्षण पूर्ण एकाग्रतेने जगतो. प्रत्येक सामना आणि प्रत्येक चेंडू मी शेवटचा असल्यासारखा खेळतो. विराटने आपल्या फिटनेस आणि मेहनतीबद्दल स्पष्ट शब्दांत मत मांडलं. जर संघासाठी मला 50 षटकं बाउंड्री ते बाउंड्री धावावं लागलं, तर मी कोणतीही तक्रार न करता ते करेन. कारण माझी तयारीच तशी असते. मी प्रत्येक चेंडूला माझ्या कारकिर्दीतील शेवटचा चेंडू समजून खेळतो. विकेतदरम्यान धावताना देखील तितक्याच जोशात धावतो. पण एवढं सगळं करून देखील मला माझी किंमत सिद्ध करावी लागणार असेल, तर ती जागा माझ्यासाठी नाही, असे तो म्हणाला.
याचदरम्यान, जवळपास दोन दशकांनंतर दिल्ली संघाकडून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पुनरागमन करताना मिळालेल्या अनुभवाबद्दल देखील विराटने सांगितले. दोन सामन्यांत 208 धाव करताना त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. मी त्या स्पर्धेत कुणाला काही सिद्ध करण्यासाठी खेळलो नव्हतो. मला फक्त क्रिकेट खेळायचं होतं, कारण मला खेळ आवडतो, असे त्याने स्पष्ट केले.
बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सामने सुरू असताना स्टेडियममध्ये एकही प्रेक्षक नसल्याचा अनुभाव सांगताना विराट म्हणाला, मी स्वतःला प्रश्न विचारला की, हे माझ्यासाठी पुरेसं प्रेरणादायी ठरेल का? पण जेव्हा माझा दृष्टिकोन बदलला आणि मी फक्त खेळाच्या प्रेमासाठी खेळू लागलो, तेव्हा बाकी सगळं गौण वाटू लागलं. दिल्लीसाठी खेळताना मी पुन्हा एकदा लहान मुलासारखा क्रिकेटचा आनंद घेत होतो, असे देखील विराटने सांगितले. हे कुणासाठी नाही, फक्त माझ्या आणि क्रिकेटमधल्या नात्यासाठी आहे. आणि जर लोक गोष्टी कठीण करण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांनी सुरूवातीपासूनच स्पष्ट बोलावं किंवा मग शांत राहून मला खेळू द्यावं, असं तो म्हणाला.
पुण्यात हॉस्पिटलमध्ये बॉम्ब सद्दश्य वस्तू ठेवणारा ताब्यात; नागपूरमध्ये महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई
विराटने या परिस्थितीची तुलना एका सामान्य नोकरीशी केली. एका दिवशी तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही खूप चांगले आहात, आणि पुढच्या आठवड्यात तुमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातात. हे योग्य नाही. जर मी चांगला नसेन, तर सुरूवातीलाच स्पष्ट सांगा. पण जर तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवत असाल, तर मग वारंवार प्रश्न उपस्थित करू नका, असे त्याने स्पष्ट केले.
आपल्या मेहनतीबद्दल बोलताना विराट म्हणाला, मी कोणत्याही मालिकेच्या दोन-तीन आठवडे आधी तयारी सुरू करत नाही. माझं संपूर्ण आयुष्यच त्या शिस्तीत जगलं जातं. मी रोज वर्कआउट करतो, योग्य आहार घेतो आणि स्वतःला कायम तयार ठेवतो. त्यामुळे जर मला कोणत्याही मालिकेसाठी बोलावलं, तर मी नेहमी तयार असतो. 2027 च्या विश्वचषकाबद्दल बोलताना विराट म्हणाला, लोक मला सतत विचारतात की मी 2027 चा विश्वचषक खेळणार का? पण मी अजूनही क्रिकेट खेळतोय, म्हणजे मला खेळायचंच आहे. भारतासाठी विश्वचषक खेळणं हा नेहमीच खास अनुभव असतो. मात्र, त्या नात्याला दोन्ही बाजूंनी तितकीच किंमत असायला हवी.
वनडे क्रिकेटमधील महान फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आतापर्यंत 311 सामन्यांच्या 299 डावांत 58.71 च्या सरासरीने 14,797 धाव केल्या आहेत. त्यात 54 शतकं आणि 77 अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षो कधी सामने खेळून देखील तो भारतासाठी सर्वाधिक धाव करणारा फलंदाज ठरला होता. या वर्षात देखील त्याने तीन वनडे सामन्यांत 240 धावा करत आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवली आहे. आयपीएलनंतर 14 जूनपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट पुन्हा भारतीय संघाकडून मैदानात उतरणार आहे.