मेस्सीला भारतात आणणाऱ्या आयोजकला अटक; जाणून घ्या, कोण आहे सताद्रु दत्ता?
महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात आला आहे. या घटनेनंतर त्याचे आयोजक सताद्रु दत्ताला अटक करण्यात आली.
Satadru Dutta arrested after fan uproar : फुटबॉल खेळातला जगजेत्ता खेळाडू लिओनेल मेस्सी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता(Kolkata) येथे आला होता. येथे तो चाहत्यांना भेटणार होता. मात्र या कार्यक्रमात परिस्थिती अनियंत्रित झालेली सॉल्ट लेक स्टेडियमवर(Salt Lake Stadium) केवळ 22 मिनिटांसाठी मेस्सी आला होता. मेस्सीला(Leonel Messi) पाहण्यासाठी येथे चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक देखील कोणाला पाहता आलेली नाही. त्यामुळे येथे प्रचंड गोंधळ झाला. 14 वर्षांनंतर भारतात मेस्सी त्याच्या ‘गोट इंडिया टूर 2025’ चा भाग म्हणून भारतात आला आहे. त्याच्या या दौऱ्याचे आयोजक सताद्रु दत्ता हे होते. ज्यांना चाहत्यांनी घातलेल्या या गोंधळानंतर अटक करण्यात आली आहे.
सताद्रु दत्ता हे ‘अ सतद्रु दत्ता इनिशिएटिव्ह’ या कंपनी अंतर्गत काम करतात. सताद्रुने यापूर्वी पेले, डिएगो मॅराडोना आणि काफू यांच्यासारख्या दिग्गज फुटबॉलपटूंसाठी भारतात कार्यक्रम आयोजित केले आहेत. फक्त कोलकाताच नाही तर विविध शहरांमध्ये मेस्सीच्या दौऱ्यांचे आयोजन करण्याची जबाबदारी सताद्रु दत्ता वर आहे. कोलकात्यानंतर मेस्सी हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीला पोहोचेल.
मेस्सीच्या कार्यक्रमातील राड्यानंतर ममता बॅनर्नीजींचा माफीनामा अन् थेट चौकशीचे आदेश
मेसीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी 4500 ते 10000 रुपयांची तिकिटे खरेदी केली होती. मेस्सी सुमारे 22 मिनिटे सॉल्ट लेक स्टेडियमवर आला. आयोजक सताद्रु दत्ता आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मेस्सीला वेढा घातला होता, ज्यामुळे चाहत्यांना त्यांचा आवडता खेळाडू पाहण्यापासून रोखले गेले. यानंतर मेस्सी स्टेडियममधून बाहेर पडल्याची माहिती मिळाली. चाहते मैदानात आले आणि गोंधळ करू लागले, आणि लवकरच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. यादरम्यान, चाहत्यांनी मैदानाच्या फायबरग्लास फोडल्या आणि खुर्च्यांची देखील तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
