‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका ऑफएअर; प्रेक्षकांचा संताप, अमोल कोल्हे यांची पोस्ट चर्चेत
महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या समाप्तीची माहिती दिली.
‘mi Savitribai Jyotirao Phule’ serial off-air : मराठी मनोरंजन विश्वातील ऐतिहासिक आणि सामाजिक आशय असलेली लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने टीआरपीच्या कारणास्तव मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहने नव्या आठ मालिकांची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर वाहिनीने अवघ्या 152 भागांमध्ये ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या मालिकेत महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या समाप्तीची माहिती दिली.
‘मालिका संपतेय… पण गोष्ट सुरूच राहणार!’ असे भावनिक शब्द वापरत त्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, ही बातमी समोर येताच मालिकेच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत वाहिनीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली खंत
मालिका बंद होण्यामागे टीआरपीचे कारण सांगितले जात असले तरी डॉ. अमोल कोल्हे यांनी टीआरपी मोजण्याच्या पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
त्यांनी म्हटले की, “आज अनेक प्रेक्षक मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहतात. मात्र टीआरपीची गणना केवळ ठरावीक वेळेत प्रसारित होणाऱ्या भागांवर केली जाते. त्यामुळे टीआरपी हे कारण माझ्या मते अर्धसत्य आहे.”
यासोबतच त्यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे, लेखक कौस्तुभ बेडेकर आणि अभिजीत खाडे यांचे आभार मानत, निर्णय प्रक्रियेतील काही बाबींवर अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केली.
14 जूनला अखेरचा भाग?
मिळालेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असून, तिच्या जागी ‘सुना येती घरा’ ही नवी मालिका सुरू होणार आहे.
सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम ही मालिका करत असल्याने तिचा स्वतंत्र प्रेक्षकवर्ग तयार झाला होता. त्यामुळे मालिकेच्या समाप्तीच्या निर्णयामुळे अनेक प्रेक्षक निराश झाले आहेत.
खान सरांच्या कोचिंग संस्थेबाहेर अज्ञातांचा गोळीबार, दोन दिवसांत कोचिंग सेंटर उडवून देऊ म्हणत हल्लेखोरांचा धुमाकूळ
सोशल मीडियावर प्रेक्षकांचा संताप
डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया देखील शेअर केल्या आहेत. मालिकेवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी ती बंद करू नये, अशी मागणी केली आहे.
एका प्रेक्षकाने लिहिले आहे —
“स्टार प्रवाह वाहिनीचा जाहीर निषेध. तुम्ही नवीन मालिका चालू करताय, त्यातून तुम्ही काय दाखवणार, कटकारस्थान कसे करायचे?. परतू ज्या माऊलीने भारत देशातील प्रत्येक मुलीना स्वाभिमाने उभं केलं, म्हणून आज प्रत्येक मुलगी शिकून कर्तृत्ववान झाली. अमोल कोल्हे सर ‘मी सावित्रीबाई फुले’ ही मालिका बंद करू नकात. ज्या प्रमाणे आपण स्वराज्य रक्षक संभाजी महाराज याचा विचार आपण घराघरात पोहोचवला. तसच सावित्रीमाई आणि जोतिबा फुले यांनी क्रांतीची मशाल पेटवली, त्याचा प्रेरणादायी विचार पोहोचवा. तुम्ही दुसऱ्या वाहिनीवर ही मालिका चालू ठेवा. कारण ही मालिका पाहून खूप लहान मुलं धडा घेत आहेत. काही झाले तरी ही मालिका चालू ठेवा ही विनंती.”
तर दुसऱ्या एका प्रेक्षकाने म्हटले आहे —
“ज्या सावित्रीबाईमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लाखो लेकी शिकून स्वातंत्र्याचा उपयोग करत आहेत, अशा सावित्रींचा इतिहास पुढे आलाच पाहिजे. मालिका जोमाने सुरू ठेवावी.”
इतिहास सांगणाऱ्या मालिकेच्या बंद होण्यावर प्रश्नचिन्ह…
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून समाजसुधारकांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे माध्यम ठरली. त्यामुळे अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मालिकांना टीआरपीच्या निकषावर थांबवले जात असल्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
दरम्यान, मालिका संपुष्टात येत असली तरी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या कार्याची प्रेरणा कायम राहील, अशी भावना कलाकार आणि प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.