अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू आढळून आल्याने खळबळ.

जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल; डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.

  • Written By: Published:
Untitled Design (60)

Swine flu found in pigs in Sakuri village : अहिल्यानगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. राहता तालुक्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू (Swine Flu) आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झालं असून या डुकरांची (Pigs) विल्हेवाट लावण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून साकुरीमध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणात अनैसर्गिक मृत्यू होत होता. डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूंमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरलं होतं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहिल्यानगरच्या (Ahilyanagar) पशुवैद्यकीय पथकानं साकुरीसह जिल्हाभरातील इतर काही गावांमधील डुकरांचे नमुने देखील गोळा केले आहेत. डुकरांचे हे सॅम्पल तपासणीसाठी भोपाळ (Bhopal) येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर या डुकरांच्या सॅम्पलमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लूचे विषाणू आढळून आले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी थेट कर्जमाफीची तारीखच केली जाहीर!

राहत्यातील साकुरी गावात मागील बऱ्याच दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळत होतं. त्यानंतर अहिल्यानगरच्या पशुवैद्यकीय पथकाने साकुरीसह जिल्ह्यातील इतर बऱ्याच गावांमधील डुकरांचे सॅम्पल मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील लॅबला तपासणीसाठी पाठवले होते. या सगळ्या सॅम्पलमधून साकुरी गावातल्या डुकरांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले असून त्यांना आफ्रिकन स्वाईन फ्लू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या मदतीने या डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पशुवैद्यकीय पथकाकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे, की मानवी आरोग्यास यापासून कोणताही धोका नाही. तरी देखील साकुरी आणि आसपासच्या इतर गावांमध्ये डुकरांचे अनैसर्गिक मृत्यू आढळून आल्यास पशु वैद्यकीय पथकाला संपर्क करण्याचं आवाहन पशु शल्यचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त मुकुंद राजळे यांनी केलं आहे.

अत्यंत घातक आणि झपाट्यानं पसरणारा हा आजार असून याचा विषाणू सामान्यपणे डुकरांमध्ये आढळून येतो. मात्र आफ्रिकन स्वाईन फ्लूपासून मानवी आरोग्याला कोणताही धोका नसल्याचं देखील यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. या आजारामुळे डुकरांच्या मृत्युदरात वाढ होते, मात्र अजूनपर्यंत तरी यावर कोणतीही खात्रीशीर लस किंवा औषध उपलब्ध नाही.

follow us