राहुरीतून निवडणूक लढू नका; गुन्हे मागे घेण्याची ऑफर जयंत पाटलांनी दिली; कर्डिलेंचा मोठा गौप्यस्फोट
Shivajirao Kardile : राज्यात विधानसभा निवडणुकीचे प्रचार शिगेला पोहोचला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीचे (MVA) नेते एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. यातच राहुरी विधानसभा मतदारसंघात (Rahuri Assembly Constituency) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डीले (Shivajirao Kardile) यांनी एका जाहीर सभेत बोलताना मोठा खुलासा केला आहे.
मला निवडणूक न लढवण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील यांनी मला गुन्हे मागे घेण्याची ऑफर दिली होती. असा मोठा खुलासा त्यांनी सभेत बोलताना केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डीले सोनेगाव सात्रळ येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) देखील उपस्थित होते.
या सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डीले म्हणाले की, मी राहुरी मतदारसंघात यंदाची निवडणूक न लढवण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मला गुन्हे मागे घेण्याची ऑफर दिली होती. मात्र मी ते अमान्य केले. कारण काही न करता यांनीच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र मी जनतेच्या आशीर्वादामुळे राजकारणात आहे. असं शिवाजीराव कर्डिले म्हणाले.
या सभेत पुढे बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, राहुरी सहकारी साखर कारखान्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव होते. ते हातोड्याने तोडून काढले आणि तनपुरेंनी आपल्या आजोबाचे नाव दिले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा मोठे आहेत का?. वांबोरी येथील कारखान्यात काय चालते हे मला माहित आहे. सरकार आल्यानंतर याची चौकशी लावली जाईल. उद्योग तुम्ही करायचे आणि खापर आमच्यावर पडायचे आता पायाखालची वाळू घसरले असून भाजप कार्यकर्त्यांना मतदारांना दमबाजी करत आहे असं देखील शिवाजीराव कर्डिले म्हणाले.
तर या सभेत बोलताना विखे पाटील यांनी देखील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी विखे पाटील म्हणाले की, राहुरी मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधींना मंत्रीपदाची संधी मिळाली. त्यांच्या सत्ताकाळात जिल्ह्याला तीन मंत्री मिळाले. एवढे असूनही त्यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे दाखवून द्यावीत. राहुरीत साधे उपजिल्हा रूग्णालय सुध्दा सुरु करता आले नाही. महायुतीचे सरकार आल्यानंतर एकट्या राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांना पिक विम्याचे 104 कोटी रुपये मिहाले. कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा कोटी रुपये मिळाले.
लाडकी बहिण योजनेतून 90 हजार महिलांच्या खात्यावर 34 कोटी रुपये जमा झाले. या सर्व योजनांचा लाभ कोणाच्याही चिठ्ठीशिवाय संबंधितांच्या बँक खात्यात जमा झाला. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी या मतदारसंघात केलेली विकासकामे आणि महायुती सरकारची दमदार कामगिरी यामुळे कर्डिले यांच्या विजयावर निकालाआधीच शिक्कामोर्तब झाले आहे. विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. असं विखे पाटील म्हणाले.
विखे पाटील पुढे म्हणाले की, सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पक्षातीलम महिला सुद्धा आता त्यांचे ऐकणार नसून त्या महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करतील. महाविकास आघाडीचे अडीच वर्ष राज्यात सरकार होते तेव्हा हे झोपले होते. त्यावेळी त्यांना लाडकी बहीण का नाही आठवली. कोविड काळामध्ये जनतेला मदतीची गरज होती. तेव्हा या जिल्ह्यातील तीन मंत्री कुठे होते? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 टक्के नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले. सन 2029 पर्यंत ही योजना चालू राहणार आहे. आता मी राहुरी शहरामध्ये 200 कोटीचे रुग्णालय सरकारच्या माध्यमातून सुरू करणार आहे. आमचे सरकार केंद्रात असून आता राज्यातही परत येणार आहे. त्यामुळे निधीची कमतरता कमी पडून दिली जाणार नाही. असं विखे पाटील म्हणाले.
यावेळी विक्रम तांबे, सुरेश बानकर, उदयसिंह पाटील, धनराज गाडे, देवेंद्र लांबे, प्रभाकर हापसे, माधव ढोकणे, सुरेंद्र थोरात, तानाजी ढसाळ, भास्कर गाडे, राजू शेटे, आर.आर. तनपुरे, अण्णासाहेब बाचकर, दीपक पवार, साहेबराव गाडे, शिवाजी सागर, तानाजी गुंड, मीराताई घाडगे, सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते.