अखेर शरद पवारांचा गड ढासळला; पश्चिम महाराष्ट्रात मिळाल्या केवळ 7 जागा
Assembly Election 2024 Result BJP Mahayuti Finish Sharad Pawar : राज्यात मागील पाच वर्षांपासून राजकीय समीकरणं बदलली (Maharashtra Assembly Election 2024) आहेत. अनेक राजकीय घराण्यांत आणि पक्षांमध्ये फूट पडल्याचं समोर आलंय. काल लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मात्र महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे. आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) असंच समीकरण होतं. परंतु या निवडणुकीने हा समज खोडून काढला आहे.
आतापर्यंत अनेक चढ-उतार आले होते, परंतु शरद पवार यांचं पश्चिम महाराष्ट्रावर वर्चस्व कायम टिकून होतं. परंतु कालच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक निकालानंतर मात्र शरद पवारांच्या हातून गढ ढासाळला आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 58 विधानसभा मतदारसंघांपैकी 46 मतदारसंघांमध्ये महायुतीला विजय झाला आहे. यामध्ये भाजपला 24, अजित पवार गटाला 11 तर शिंदे गटाला 7 जागा मिळालेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला मिळालेल्या 12 जागांमध्ये शरद पवार गटाला 7, ठाकरे गटाला 2 आणि काँग्रेसला 1 जागा मिळालेली आहे.
Rajesh Tope : मराठवाड्यात शरद पवारांना मोठा धक्का! करोना वॉरियर ठरलेले राजेश टोपे पराभूत
साखर पट्ट्यात भाजप आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. शरद पवारांचा सबालेकिल्ला ढासळल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. आतापर्यंत शरद पवार यांनी सहकारी संस्था, साखर कारखाने आणि सहकार चळवळीची सांगड घातली. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वत:च्या पक्षाची मोठी ताकद उभी केली. भाजपने 2014 नंतर देशात आणि राज्यामध्ये सत्ता काबीज केली. परंतु शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला अद्याप धक्का बसलेला नव्हता. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवार ब्रॅंड असं गृहीतक होतं. परंतु यंदाच्या निकालानं मात्र हे समीकरणच मोडीत काढलं आहे. हा शरद पवारांना सर्वांत मोठा धक्का मानला जातोय.
Election Result 2024 : महाराष्ट्राची कमान कोण सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढं?
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात 21 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीला एकूण 27 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना पश्चिम महाराष्ट्रात केवळ 7 जागा मिळाल्या आहेत.सातारा आणि कोल्हापूर शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. धक्कादायक म्हणजे या भागात शरद पवार यांना एकही जागा मिळालेली नाही.
महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रात अपयशी कारण…
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापासूनच महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु असल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद रंगला होता. त्यामुळे ग्राऊंड लेव्हलला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये फारसा समन्वय नव्हता. याचा फटका शरद पवार गटाला आणि पर्यायाने मविआला बसला. याशिवाय, भाजपने या भागात पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना रिंगणात उतरवले होते. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या बाजूने निर्माण झालेले वातावरण मविआला आपल्या बाजूने वळवणे शक्य झाले नाही. शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या सभांमध्ये कापूस आणि सोयाबीनसह शेतमालाच्या दराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा मुद्दा शेतकरी वर्ग आणि स्थानिक मतदारांना तितकासा भावला नाही.