Exit Polls 2024 : खरी शिवसेना कुणाची? एक्झिट पोलच्या अंदाजात नेमकं काय..

Exit Poll Results 2024 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. उद्धव ठाकरेंच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट चांगला राहिला होता. आता हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत राहिल का असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. पण, काल मतदानानंतर जे एक्झिट पोल समोर त्यातून तरी असं काही दिसत नाही. विविध संस्थांच्या एक्झिट पोल्समध्ये उद्धव ठाकरेही जोरदार टक्कर देताना दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊ या की एक्झिट पोल्सने खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कोण सरस ठरलं या प्रश्नांचं उत्तर दिलंय का..
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी जवळपास 64 टक्के मतदान झालं. या मतदानानंतर एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले. यात काही संस्थांनी महायुती तर काही संस्थांनी महाविकास आघाडीली कौल दिला. तसेच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा मिळतील याचाही ढोबळ अंदाज व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने 95 जागांवर उमेदवार दिले होते. तर महायुतीत शिंदे गटाला 81 जागा मिळाल्या होत्या. आता या निवडणुकीतील विविध एक्झिट पोल्समध्ये शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात जोरदार टक्कर होताना दिसत आहेत. दोन्ही गटात फारसा फरक दिसत नाही.
उत्तर महाराष्ट्रात गुलाल कुणाचा? महायुती की मविआ? एक्झिट पोलचा अंदाज काय..
पोल डायरीच्या अंदाजानुसार शिवसेना शिंदे गटाला 27 ते 50 जागा मिळतील तर ठाकरे गटाला 16 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकशाही मराठी रुद्रच्या एक्झिट पोलनुसार शिंदे गटाला 30 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो तर ठाकरे गटाचे उमेदवार 39 ते 43 जागांवर विजयी होऊ शकतात असा अंदाज आहे. या दोन्ही संस्थांच्या पोल्सचा विचार केला तर ठाकरे गट आणि शिंदे गटात फारसा फरक दिसत नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेतही दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत होताना दिसत आहे.
मॅट्रिक्स संस्थेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 21 ते 39 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 27 ते 45 जागा मिळतील असा अंदाज आहे. इलेक्टोरल एजने मात्र ठाकरे गटाला स्पष्ट कौल दिला आहे. या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार उद्धव ठाकरेंची शिवसेना सरस ठरताना दिसत आहे. ठाकरेंना 60 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 26 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चाणक्यच्या अंदाजानुसार ठाकरे गटाला 63 तर एकनाथ शिंदे गटाला 63 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. म्हणजेच या एक्झिट पोलनुसार शिंदे आणि ठाकरे गटात फिफ्टी फिफ्टी सामना होण्याचा अंदाज दिसत आहे.
ठाकरेंचा दबदबा, शिंदेंचीही क्रेझ
एक्झिट पोल्सच्या या अंदाजांनुसार दोन्ही गटात टफ फाईट ही एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. राज्यातील जनतेनं अजूनही उद्धव ठाकरेंची साथ पूर्णपणे सोडलेली नाही हेच यावरून दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंचं नाणं खणखणीत वाजताना दिसत आहे. तर एकनाथ शिंदे यांचीही क्रेझ कमी होण्याचे कोणतेही संकेत या एक्झिट पोल्समधून मिळालेले नाहीत. ठाणे आणि मुंबई पट्ट्यात ठाकरे गटाची ताकद फारशी कमी झाल्याचं या एक्झिट पोल्समध्ये दिसलेलं नाही.
टीव्ही 9 रिपोर्टर पोलच्या आकडेवारीनुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक म्हणजेच 80 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिंदे गटालाही 25 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 23 पेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता आहे.
या पोलनुसार महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेसला 50, ठाकरे गटाला 44 पेक्षा जास्त तर शरद पवार गटाला 42 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. या पोलचा अंदाज पाहिला तर ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. अर्थात हा फक्त अंदाज आहे. शनिवारी (23 नोव्हेंबर) मतमोजणीनंतर कोण गुलाल उधळणार याचं उत्तर मिळणार आहे.
पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल