संजय सावकारेंविरोधात 10 जणांचा शड्डू; शरद पवार कोणाला आशीर्वाद देणार?
रेल्वेचे सर्वात मोठे जंक्शन, आशिया खंडातील मोठे रेल्वे यार्ड अशी भुसावळची पहिली आणि मुख्य ओळख. याच ओळखीच्या जोरावर भुसावळचे (Bhusawal) नाव देशात घेतले जाते. तापी नदीच्या तीरावर वसलेल्या या शहराच्या जवळच दोन मोठे आयुध निर्माण कारखाने, औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. या कारणामुळे परजिल्हा आणि परराज्यातील नागरिकांची, कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा या मतदारसंघात बाहेरुन येऊन मतदार झालेले आणि लेवा पाटील समाजातील बहुसंख्य मतदार इथला आमदार ठरवत असतात.
तब्बल सहा टर्म काँग्रेस (Congress), दोन टर्म शिवसेना (Shivsena), दोन टर्म राष्ट्रवादी (NCP) आणि दोन टर्म भाजप (BJP). थोडक्यात आतापर्यंत सर्वच पक्षांनी भुसावळची आमदारकी आतापर्यंत खिशात घातली आहे. दरवेळी लोकसभेला भाजपाला साथ देणार हा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत मात्र वेगळा निर्णय घ्यायला मागे-पुढे बघत नाही. त्यामुळेच राखीव असला तरी या मतदारसंघात काय होते याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. (Ten people have sought candidature from Sharad Pawar against BJP’s Sanjay Savkare in Bhusawal assembly constituency)
त्याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या स्पेशल सिरीजमध्ये पाहुया भुसावळमध्ये यंदा नेमके काय होणार?
भुसावळ मतदारसंघाची राजकीय पार्श्वभूमी समजून घेण्याआधी इथली सामाजिक रचना समजून घेणे गरजेचे आहे. 2009 पासून भुसावळ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मात्र लेवा पाटील समाजाचे एकहाती वर्चस्व असलेला हा मतदारसंघ. आज घडीला जवळपास 75 हजार लेवा पाटील समाजाचे मतदार आहेत. त्यात एकूण मतदानापैकी 80 टक्के मतदान एकगठ्ठा होते, असा इतिहास आहे. त्यामुळेच 1962 पासून 2004 पर्यंतच्या 12 निवडणुकीत तब्बल नऊ वेळा लेवा पाटीदार समाजाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे.
यात 1962 ते 1985 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. निळकंठ साने, दत्तात्रय भिडूर, प्रभाकर महाजन, देविदास भोळे हे काँग्रेसकडून आमदार झाले. 1985 साली कामगार नेते दगडू चौधरी (डी.के.चौधरी) यांनी जनता दलाकडून विजय मिळविला. 1980 साली दगडू चौधरींचा अवघ्या एक हजार मतांनी पराभव झाला होता. पुढे 1990 मध्ये काँग्रेसने मो.यासीन बागवान यांच्या रुपाने मतदारसंघ पुन्हा मिळवला. बागवान हे लेवा पाटील समाजाव्यतिरीक्त आमदार झालेले पहिलेच उमेदवार.
रावेरच्या आखाड्यात ‘नव्या भिडूं’मध्ये कुस्ती; भाजपचा पैलवान थांबवणार?
1995 ची निवडणूक भुसावळसाठी अत्यंत नाट्यमय ठरली होती. शिवसेनेने सुरुवातीला तत्कालिन जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण ऐन प्रचारसभेत बाळासाहेब ठाकरे यांनी अचानक दायमा यांच्या ऐवजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोळे यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाली तेव्हा स्वतः भोळेही देखील गोंधळलेले होते. पण भुसावळकरांनी ठाकरे यांचा शब्दाला साथ देत दिलीप भोळे यांना विधानसभेत पाठवले.
1999 मध्ये ही दिलीप भोळे यांनीच भगवा फडकवला. 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष चौधरी यांनी भोळे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. चौधरी हे अल्पसंख्याक असलेल्या तेली समाजाचे, तरीही त्यांनी 27 हजार मतांची आघाडी घेतली होती.
या मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अल्पसंख्यांक समाजाचे प्राबल्य असल्याने 2009 च्या पुनरर्चनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यावेळी राष्ट्रवादीचा उमदेवाराचा शोध आमदार संतोष चौधरींचे स्वीय सहायक असलेल्या संजय सावकारे यांच्यापर्यंत येऊन थांबला. सावकारे यांना या निवडणुकीत यशही मिळाले आणि पहिल्याच टर्ममध्ये जळगावच्या पालकमंत्री पदाची लॉटरी लागली. 2014 च्या मोदी लाटेत आमदार संजय सावकारे यांनी राजकारणातील बदलते वारे ओळखत भाजपात प्रवेश करत केला. त्यांच्याविरोधात त्यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी रान उठवले.
ज्या पक्षाने संधी दिली, मंत्री केले, त्याच पक्षाला सोडून चालल्याने चौधरींना सावकरेंचा निर्णय मान्य नव्हता. पण सावकारे यांनी भाजप प्रवेश केला. चौधरींना पुरुन उरत निवडूनही आले. 2019 मध्येही सावकारे रिंगणात होते. तर त्यांच्यासमोर आघाडीचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगन सोनवणे यांनी नशीब आजमावले. त्याचवेळी, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मधू मानवतकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. भाजपचे संजय सावकारे आणि आघाडीचे जगन सोनवणे या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अडचणी वाढविण्यासाठी माजी आमदार संतोष चौधरी यांनी ही खेळी केल्याचे बोलले गेले. त्यावेळी राष्ट्रवादीने मनासारखा उमेदवार न दिल्याने संतोष चौधरींनी डॉ. मधू मानवतकर यांना पाठींबा देऊन धक्कातंत्र अवलंबले. पण अशा लढतीतीही सावकारे विजयी ठरले.
मराठा चेहरा, एक गठ्ठा मतदान; महाजनांविरोधात पवारांच्या डोक्यात ‘खास’ प्लॅन
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे यांना 41 हजारांचे लीड मिळाले आहे. शिवाय सावकारे हेही एकेकाळी खडसे यांचे समर्थक मानले जायचे. खडसे यांच्या याच जवळीकतेचा फायदा त्यांना होत आला आहे. खडसे यांनीही माजी आमदार संतोष चौधरी यांना शह देण्यासाठी कायमच सावकारे यांना साथ दिली. आता सावकारे यांनी जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांच्या वर्तुळात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही संजय सावकारे हेच भाजपचे उमेदवार असतील हे नक्की आहे.
इकडे महाविकास आघाडीमध्ये अगदी विरुद्ध स्थिती आहे. आघाडीत सारेच काही अलबेल नाही. संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतरही शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चौधरी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र शरद पवार यांनी ऐनवेळी श्रीराम पाटील यांना आयात करुन तिकीट दिले. त्यामुळे चौधरी कमालीचे नाराज झाले होते. ते प्रचारातही फारसे दिसत नव्हते. मात्र अखेरच्या चार दिवसांमध्ये शरद पवार यांनी समजूत काढल्यानंतर ते प्रचारात सक्रिय झाले होते. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी चौधरी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी सोडणार असल्याचे सांगितले होते.
आता दोन महिन्यांमध्ये संतोष चौधरी नेमके कोणत्या पक्षात आहेत याचा अंदाज लावता येईना झाला आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये राहिल्यास विधानसभेला चौधरी यांना हवा असलेलाच उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. नुकतेच पुण्यामध्ये भुसावळमधील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यात शहरातील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अनुपकुमार प्रेमचंद मनुरे, डॉ.राजेश मानवतकर, प्रीती तोरण महाजन, प्रा.डॉ.जतीन मेढे, दिनेश भोळे, प्रा.एम.आर.संदानशीव, संगीता भामरे, माजी नगरसेवक जगन सोनवणे, नंदा सपकाळे या दहा उमेदवारांनी मुलाखती देत पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे. यात आता संतोष चौधरी यांच्या मनात कोण आहे? आणि शरद पवार हे त्या नावावर तयार होतात का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.