त्यांना खाण्याचं नाही पिण्याचं विचारा; मंत्री शिरसाटांना मटण पार्टीवर केलेल्या टिकेवरून जलीलांचा टोला

Imtiaz Jalil on Sanjay Shirsat : आज १५ ऑगस्टनिमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या महानगरपालिकेच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी (Shirsat) या निर्णयाला विरोध करताना स्वातंत्र्यदिनी बिर्याणी खाण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिलं होतं. यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली होती.
इम्तियाज जलील हे टीआरपीसाठी नाटक करत असल्याचं विधान संजय शिरसाट यांनी केलं होतं. आता या टीकेला प्रत्युत्तर देताना इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी मार्केटमध्ये गेलो तर मटण आणू शकतो, कधी चिकन असू शकतो. त्यांच्या बॅगेत काय असते हे महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला त्यांनी लगावलाय.
सरकारच्या मांसविक्री बंदी निर्णयाला जलीलांचं थेट आव्हान; चिकन-मटणाचा बेत, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण
त्याचबरोबर ते काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना पिण्याबद्दल विचारा कोणते-कोणते ब्रँड आहेत, हे विचारा, त्यांना ते माहिती असते. यावर त्यांचं लक्ष जास्त असतं. एकदा प्यायल्यानंतर त्यांच्यापुढं जर तुम्ही त्यांच्यासमोर शाकाहारी जेवण ठेवलात आणि ते चिकन आहे असं जर सांगितलं तर ते देखील खाऊ शकतात, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला आहे.
तुमच्या बॅगेत काय काय सापडलेले आहे. त्याबद्दल तुम्ही विचार करा. माझी चिंता करु नका. मी विरोधी पक्षातील एक लहान माणूस आहे. माझ्याबद्दल तुम्ही बोलणं हे शोभत नाही. तुम्ही मोठे नेते आहात. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहात, तुम्ही जिल्ह्याचा विकास कसा करणार, काय काय नवीन उद्योग आणणार आहात, हे सांगा. समाजकल्याण विभागात तुम्ही आता काय करणार आहेत याबद्दल आपण बोललो तर बरं होईल असंही जलील यांनी सुनावलं आहे.
१५ ऑगस्ट रोजी काही महानगरपालिकांनी मांस, मासे आणि अंडी यांच्या विक्री आणि कत्तलीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. १९८८ च्या एका कायद्याचा आधार घेत कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये ही बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाला विरोध दर्शवत खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यदिनी बिर्याणी खाणार असल्याचं जाहीर करत मुख्यमंत्री आणि मनपा आयुक्तांना पार्टीचे आमंत्रण दिलं. तसंच, त्यांच्या घरी मटण आणि चिकणची त्यांनी मोठी पार्टी ठेवली.