जीव चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, कलाकार आणि प्रेक्षकांच्या मनमोकळ्या गप्पाही रंगल्या
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
Audience response to the screening of the film Jeev : दर्जेदार आशयघन चित्रपट युवा पिढीसह सर्वच वयोगटातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सुजाण प्रेक्षकवर्ग घडविण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे चित्रपट प्रदर्शनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेल्या ‘जीव’ चित्रपटाचे प्रदर्शन मंगळवार, 26 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात संपन्न झाले. याप्रसंगी चित्रपटातील कलाकारांसह बहुसंख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जीव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्त अधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे यांच्यासह चित्रपटातील प्रशांत कांबळे, रविंद्र जाधव, उषा रविंद्र जाधव, समृद्धी रविंद्र जाधव, प्रसाद कुंभार, करण जाधव, विशाल नामदेव सिरसट, अक्षय कदम, अभय पोते, ओंकार गोखले, आदर्श सातपुते हे कलाकारही उपस्थित होते. याप्रसंगी कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. तसेच मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त करताना दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या उपक्रमाचे भरभरून कौतुकही केले.
लग्नासाठी काहीही! पुण्यात तरुणाचे अपहरण करून बीडला नेले, तरुणींसह 7 जणांना अटक
ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील श्रद्धा, परंपरा आणि मानवी संघर्ष यांचे अत्यंत संवेदनशील चित्रण करणाऱ्या ‘जीव’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र जाधव यांनी केले असून शिवाजी शेवाळे, बेबीताई सूर्यवंशी, किरण काकडे, दीक्षा उजागरे, आदर्श जाधव, समीर रामटेके, रवींद्र जाधव, उषा निंबाळकर आदी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जीव’ चित्रपटाचा विशेष गौरव करण्यात आला असून, चित्रपटातील कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाचेही भरभरून कौतुक करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाने कान चित्रपट महोत्सवाच्या चित्रपट बाजार विभागासाठी निवडलेल्या मराठी चित्रपटांमध्येही ‘जीव’ चित्रपटाची निवड झाली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रम, दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन
दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम नाविन्यपूर्ण असून अभिरूची घडविणारा आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत दर्जेदार असे निवडक चित्रपट दाखविले जात असून प्रेक्षकवर्ग हा अभ्यासू व विचारी आहे. खरंतर सर्वांनी दर महिन्याला एकत्र येऊन चित्रपट पाहण्याचा आनंद घेण्याची कल्पनाच उत्तम आहे. त्यामुळे या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा असून, याप्रकारचा उपक्रम चित्रनगरीने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही सुरू करावा, अशी माझी अपेक्षा आहे आणि यादृष्टीने आयोजकांचे प्रयत्न सुरू आहेत, याचा मला आनंद आहे. असं सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यावेळी म्हणाले.