ज्येष्ठ पटकथा लेखक जयंत धर्माधिकारी काळाच्या पडद्याआड
मुंबई: मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ पटकथा लेखक जयंत धर्माधिकारी (Jayant Dharmadhikari) यांचे निधन झाले आहे. त्यांनी ऑंखे, यह वादा रहा, मै इंतकाम लूंगा, कबीला, रफू चक्कर, प्रेम कहानी, बेनाम, खोटे सिक्के यासारख्या चित्रपटांचं लेखन त्यांनी केलं. धर्माधिकारी यांनी 1984 साली पटकथा लेखक म्हणून करिअरला सुरुवात केली होती.
सामना या जब्बार पटेल दिग्दर्शित सिनेमात त्यांनी अभिनयही केला होता. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांबरोबर जाणकार समीक्षकांचीही दाद मिळवली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे.
ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे यांनी धर्माधिकारी यांच्या निधनाविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलं की, हिंदी चित्रपटांचा कथा व पटकथा लेखक, आमचा साप्ताहिक दिनांकपासूनचा मित्र, केशव गोरे ट्रस्टचा विश्वस्त, समाजवादी चळवळीतील जुना कार्यकर्ता, जॉर्ज फर्नांडिसचा विश्वासू जयंत धर्माधिकारी याचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. अभिनेत्री सुहिता थत्ते ही त्याची पत्नी.
माझ्या विवाहाला 40 वर्षे झाल्याबद्दल गेल्या महिन्यात झालेल्या गेट टू गेदरला जयंत व सुहिता आले होते. जयंतने काही हिंदी चित्रपटांच्या कथा पटकथा लिहिल्या आहेत. तो खोसला फिल्म्सशी बराच काळ जोडला गेला होता, असं साबडे यांनी लिहिलं आहे.
धर्माधिकारी यांच्या निधनानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपला शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जयंत धर्माधिकारी यांच्या निधनाची बातमी नुकतीच कळली.आम्हा सर्वांचा जेष्ठ मित्र – मार्गदर्शक गेला. अलविदा जयंत, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Eknath Shinde होय मी साक्षीदार आहे… फडणवीस, महाजनांना अटक करण्याच्या कटाचा!