Download App

Devmanus film review: उंबरठ्यावर आलेलं वादळ परतवून लावणारा ‘देवमाणूस’

विषयाची निवड आणि गोष्टीशी इमान राखून स्वतः व्यतिरिक्त सेटवर असणाऱ्या तीन अभिनेत्री दिग्दर्शकांना हाताळण्याचे कसब यासाठी दिग्दर्शक तेजस देऊस्करला स्पेशल ब्राऊनी पॉईंट्स द्यायला हवेत.

  • Written By: Last Updated:

Devmanus marathi film review: आयुष्य एका सरळ रेषेत सुरू असताना मध्येच अडथळ्यांची शर्यत सुरू व्हावी आणि एकूणच सगळ्या प्रवासाला कलाटणी मिळावी असं काहीसं केशव मास्तरांच्या आयुष्यात घडतं आणि जगण्याला एक वेगळीच दिशा मिळून जाते. आयुष्याच्या सांजपर्वात घडलेल्या या घटना क्रमाने केशव आणि त्याची पत्नी लक्ष्मी हादरून जातात. पापभिरू असणारं हे दांपत्य त्यांच्या रोजमर्राच्या लढाईत पिचून निघत असताना संकटांच्या दुष्टचक्रात कसे अडकतात… तिथून त्यांची सुटका होते का ? त्याचा हा प्रवास म्हणजे देवमाणूस (Devmanus).

आपण बरं… आपलं घर बरं… असं सर्वसामान्य वारकरी असलेल्या केशवनी मुलाच्या शिक्षणासाठी बँकेचा आणि खाजगी कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचे हप्ते फेडताना स्वतःच्या पोटच्या मुलाने आई बाबाकडे पाठ फिरवून वेगळ्या अर्थाने ‘ऋण’ फेडले तर ससेहोलपट होणाऱ्या वृद्ध दांपत्याची त्याच्यावर आलेल्या संकटाला कशाप्रकारे तोंड देण्यासाठी हा सर्वसामान्य माणूस उंबरठ्यावर आलेलं वादळ परतवून लावण्यासाठी काय काय करतो त्याची गाथा म्हणजे देवमाणूस हा सिनेमा आहे.

लव फिल्म्सच्या ‘वध’चा रिमेक असणाऱ्या या सिनेमातलं मराठमोळपण जपत अर्थाचे अपहरण न होऊ देणे आणि कथानकाची गतिमानता राखण्यात पटकथा आणि संवाद लेखिका नेहा शितोळेला सूर गवसला आहे. मूळ कथालेखक जसपाल सिंग संधू आणि राजीव बर्नवाल यांच्या कथेतलं सत्व आणि त्याची ताकद आपल्याला खिळवून ठेवते.

वधमधील संजय मिश्रा आणि मीना गुप्ता यांचा दमदार परफॉर्मन्स आपल्या मनातून हलत नाही. या सिनेमातून आपल्यासमोर आलेला नवा चेहरा सिद्धार्थ बोडके या सिनेमाचं शक्तिस्थान म्हणायला हवं. सिद्धार्थने साकारलेला खलनायक त्याचं वागणं बोलणं हावभाव लकबी या साऱ्या गोष्टी त्याच्यातल्या सशक्त अभिनेत्याची चुणूक दाखवतात. कित्येक वर्षानंतर मराठीला नवा खलनायकी चेहरा देण्यात सिद्धार्थला सूर सापडला आहे असं म्हणता येईल. सिद्धार्थने साकारलेला दिलप्या शेठ खलनायक असला तरी आपली छाप सोडून जातो. रंगभूमी आणि काही निवडक सिनेमांमधून आपल्यासमोर आला आहे, पण आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणाऱ्या सिद्धार्थ वर अभिनयाचा आलेख सातत्याने उंचावत ठेवण्याची जबाबदारी ही आहे.

नुकताच येऊन गेलेल्या जुनं फर्निचरमध्ये साकारलेला वृद्ध दबंगमधला वृद्ध बाप आणि तुला केशव मास्तर साकारताना महेश मांजरेकर यांनी स्वतःतल्या वेगळ्या छटा शोधण्याचा केलेला प्रयत्न निश्चित जाणवतो. सात्विकपणा ते उदवेग यामधील बिटवीन द लाईन्स मांजरेकरांनी नेमक्या पद्धतीने टिपलेल्या आहेत. सात्विक सोज्वळ सोशिक लक्ष्मी साकारताना रेणुका शहाणे यांनी त्यांच्यातल्या जाणीव संपन्न अभिनेत्रीची झलक दाखविली आहे.

पोलिसी खाक्यातली ग्रे शेड रंगवताना सुबोध भावेने तितक्याच दमदारपणे इन्स्पेक्टर देशमुख साकारला आहे. आजपर्यंत गोड गुलाबी व्यक्तिरेखांमध्ये दिसलेला अभिजीत खांडकेकर यांनी साकारलेला राजकारणी ‘जेधे’ त्याच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतला वेगळा आयाम देण्याची शक्यता निर्माण करतो. हवालदार म्हणून सहाय्यक दिग्दर्शक असणारा शाळामधील अंशुमन जोशी लक्षात राहतो. रिक्षावाला या छोट्या भूमिकेतही सहाय्यक दिग्दर्शक लेखक विनोद वनवे हा देखील आपली छाप पाडून जातो.

पूर्वार्ध हा कॅरेक्टरसाठी वापरला असला तरी सिद्धार्थ बोडके हा त्यामधील जमेची बाजू आहे. घटनाक्रमही कथानकाला वेगळी गती देते.
संगीतकार रोहन यांनी दशावतारासाठी केलेलं मेटल फ्युजनचा केलेल्या वेगळ्या प्रयत्नाचे कौतुक करायला हवं. पांडुरंग या गाण्यामध्ये पारंपरिकता आणि नवतीचं केलेलं मिश्रण शेखर रवजीयानी याच्या आवाजाचा एंड स्कूलला केलेला वापर त्यांचे वेगळेपण सिद्ध करतात.

विषयाची निवड आणि गोष्टीशी इमान राखून स्वतः व्यतिरिक्त सेटवर असणाऱ्या तीन अभिनेत्री दिग्दर्शकांना हाताळण्याचे कसब यासाठी दिग्दर्शक तेजस देऊस्करला स्पेशल ब्राऊनी पॉईंट्स द्यायला हवेत. महत्त्वाच्या घटना क्रमाला चित्रित करताना तेजसने दशावताराचा केलेला डिवाइस महत्त्वाचा ठरतो. संकलक फैजेल महाडिक आणि सिनेमॅटोग्राफर अमेय चव्हाण यांनी पडद्यामागे छाप सोडलीय.


हा सिनेमा का पहावा ?
सशक्त कथानकासाठी, उत्तम स्टारकाच्या दमदार अभिनयासाठी

का टाळावा ?
वध पाहिला असेल तर ..

थोडक्यात काय ?
उत्तम कथानक असलेला दमदार सिनेमा

या सिनेमाला मी देतो
⭐⭐⭐⭐

– अमित भंडारी, चित्रपट समिक्षक

follow us