तो परत येतोय! ‘देवमाणूस-मधला अध्याय’ मालिकेचा प्रोमो रिलीज; तिसऱ्या सीजनमध्ये नवं काय?

Devmanus Marathi Serial : झी मराठीवर ‘देवमाणूस‘ मधला अध्याय (Devmanus Marathi Serial) या मालिकेचा प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या तिसऱ्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार? यात कोण कोण कलाकार असणार ? याची सगळीकडे चर्चा सुरू झाली. तर मालिकेत परत एकदा आपल्याला देवमाणसाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड दिसणार आहे. त्याचबरोबर आधीच्या दोन्ही सीजन गाजवणारी आणि तिच्या अस्सल गावरान भाषेने प्रेक्षकांचं मन जिंकलेली सरू आज्जी म्हणजे रुक्मिणी सुतार सुद्धा असणार आहेत. तसेच या मालिकेत पहिल्या दोन सीझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्र पाहायला मिळणार आहेत.
देवमाणूस मधला अध्याय या मालिकेची कथा, पहिल्या आणि दुसऱ्या सीजनच्या मधली आहे. डॉक्टर अजितकुमार देव कातळवाडीतून निघून गेल्यानंतर आणि तो परत येऊन त्याला फाशी झाली, त्याच्या मध्ये तो कुठे होता ? काय करत होता ? तिथेही तो कसा पोहचला? त्याने कुणाला फसवलं? माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला? हे सगळं आपल्याला देवमाणूसमधला अध्याय या मालिकेत पहायला मिळणार आहे.
मलाही काम करताना तिच्याकडून उर्जा मिळाली, मांजरेकरांनी केलं ‘देवमाणूस’मधील अभिनेत्रीचं कौतुक
आधीच्या दोन्ही सीजनप्रमाणे या मालिकेचही लेखन स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम हीच जोडी करणार आहे. स्वप्नील गांगुर्डे पटकथा तर विशाल कदम संवाद लेखन करणार आहेत. त्यामुळे पहिल्या दोन्ही सीजनप्रमाणे याही मालिकेत उत्कंठा वाढवणारे कथानक आणि अस्सल गावरान म्हणी, खुसखुशीत संवाद असणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजू सावंत करत आहेत. त्यांनीच आधीच्याही दोन्ही सीझनचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे देवामाणूसची जादू कायम राहणार हे निश्चित. वज्र प्रोडक्शनच्या श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून लवकरच तुम्हाला झी मराठीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे.