मोआना’च्या भव्य जागतिक प्रीमियरमध्ये ड्वेन जॉन्सनची अनोखी एंट्री; माऊईच्या जादुई हुकसह वेधले सर्वांचे लक्ष

निळ्या गालिच्यावर प्रवेश करताना त्यांनी आपल्या लोकप्रिय पात्र माऊईची आठवण करून देणारा त्याचा प्रसिद्ध जादुई हुक हातात घेतला होता.

  • Written By: Published:
Untitled Design (4)

Dwayne Johnson’s unique entry at the premiere : डिस्नेच्या बहुप्रतीक्षित लाइव्ह-अॅक्शन चित्रपट मोआनाच्या जागतिक प्रीमियरचा सोहळा नुकताच अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील प्रसिद्ध हॉलिवूड बाउलमध्ये दिमाखात पार पडला. चित्रपटातील कलाकार, निर्माते आणि तांत्रिक चमूच्या उपस्थितीने हा सोहळा अविस्मरणीय ठरला. यावेळी माऊईची भूमिका साकारणारे आणि चित्रपटाचे निर्माते असलेले ड्वेन जॉन्सन, मोआनाची भूमिका साकारणारी कॅथरीन लागाआया, दिग्दर्शक व कार्यकारी निर्माता थॉमस कैल, निर्माता व गीतकार लिन-मॅन्युएल मिरांडा तसेच रेना ओवेन आणि जॉन तुई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रीमियरमधील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले ते ड्वेन जॉन्सन. निळ्या गालिच्यावर प्रवेश करताना त्यांनी आपल्या लोकप्रिय पात्र माऊईची आठवण करून देणारा त्याचा प्रसिद्ध जादुई हुक हातात घेतला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये आणि छायाचित्रकारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. विशेष म्हणजे, ड्वेन जॉन्सन यांनी आपल्या पत्नी आणि मुलींसोबत या सोहळ्याला हजेरी लावत हा क्षण आणखी खास बनवला.

कार्यक्रमाची सुरुवात दिग्दर्शक थॉमस कैल आणि गीतकार लिन-मॅन्युएल मिरांडा यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर प्रसिद्ध नोनोसिना नृत्यगटाने पारंपरिक नृत्य, थेट तालवाद्य, मंत्रोच्चार आणि गायनाच्या माध्यमातून पॅसिफिक बेटांची समृद्ध संस्कृती साकारत उपस्थितांची मने जिंकली. यानंतर पारंपरिक पॉलिनेशियन विधीचे आयोजन करण्यात आले. या सांस्कृतिक सोहळ्यात कॅथरीन लागाआया आणि ड्वेन जॉन्सन यांनीही उत्साहाने सहभाग घेत पारंपरिक नृत्य सादर केले. त्यांच्या या सादरीकरणातून मोआनाच्या कथेमागील सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचा प्रभावी परिचय घडला.

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याची तयारी अंतिम टप्प्यात; मसुद्यासाठी सात सदस्यीय समिती नियुक्त

मोआना हा डिस्नेच्या ऑस्कर-नामांकित लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपटाचा लाइव्ह-अॅक्शन अवतार आहे. या कथेत मोआना (कॅथरीन लागाआया) समुद्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या मोटुनुई बेटाच्या सुरक्षित सीमारेषेबाहेर पहिल्यांदाच प्रवासाला निघते. तिच्यासोबत असतो दंतकथांमधील अर्धदेव माऊई (ड्वेन जॉन्सन). आपल्या लोकांचे भविष्य आणि समृद्धी पुन्हा मिळवून देण्यासाठी ते दोघे एका रोमांचक आणि अविस्मरणीय साहसाला सुरुवात करतात.

चित्रपटाचे दिग्दर्शन एमी आणि टोनी पुरस्कार विजेते थॉमस कैल यांनी केले आहे. ड्वेन जॉन्सन, ब्यू फ्लिन, डॅनी गार्सिया, हिराम गार्सिया आणि लिन-मॅन्युएल मिरांडा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर स्कॉट शेल्डन, चार्ल्स न्युवर्थ, थॉमस कैल आणि ऑलिई क्राव्हाल्हो हे कार्यकारी निर्माते आहेत. विशेष म्हणजे, ऑलिई क्राव्हाल्हो यांनी मोआना आणि मोआना २ या अॅनिमेटेड चित्रपटांमध्ये मोआनाला आवाज दिला होता.

या चित्रपटात ‘अलॉन्ग द वे’ हे नवे गीतही प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. हे गाणे लिन-मॅन्युएल मिरांडा यांनी लिहिले असून ऑलिई क्राव्हाल्हो, कॅथरीन लागाआया आणि ड्वेन जॉन्सन यांनी ते सादर केले आहे. याशिवाय मूळ चित्रपटातील लोकप्रिय गाणी आणि संगीतकार मार्क मॅन्सिना यांचे पार्श्वसंगीतही चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. भव्य दृश्यरचना, मनमोहक संगीत आणि साहसाने भरलेली मोआनाची जादुई सफर आता भारतीय प्रेक्षकांनाही अनुभवता येणार आहे. हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये १० जुलै २०२६ रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us