दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा; स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
Independence Day दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन आज उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
Independence Day celebrated at Dadasaheb Phalke Chitranagari; flag hoisted by Swati Mhase Patil : दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन आज उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी तसेच चित्रनगरीतील निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अभिनेत्री वीणा जामकर यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. उपस्थितांनी देशभक्तीपर वातावरणात ‘वंदे मातरम्’, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन केले. या वेळी संपूर्ण चित्रनगरी परिसर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वाती म्हसे पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि महामंडळाच्या वाटचालीत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. महामंडळाच्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण होत असताना, या गौरवशाली वाटचालीचा वारसा जपत चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रशासकीय व अभियांत्रिकी विभागाच्या नूतनीकरण केलेल्या कक्षाचे उद्घाटन
दादासाहेब फाळके चित्रनगरीतील प्रशासकीय व अभियांत्रिकी विभागाच्या नूतनीकरण केलेल्या कक्षाचे तसेच अभ्यंगत कक्षाचे उद्घाटन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. नूतनीकरणामुळे विभागाला अधिक सुसज्ज, प्रशस्त आणि कार्यक्षम स्वरूप प्राप्त झाले असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कामाचे अधिक चांगले वातावरण उपलब्ध झाले आहे.
हायड्रोजन ट्रेनपासून सौरऊर्जेपर्यंत; लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितली देशाच्या प्रगतीची कहाणी
या वेळी स्वाती म्हसे पाटील यांनी नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करून इमारतीतील विविध सुविधांची माहिती घेतली. कामाची गुणवत्ता, नियोजन आणि वेळेत पूर्ण केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः अभियांत्रिकी विभागाचे अभियंता विजय बापट यांनी नूतनीकरणाच्या कामात घेतलेल्या पुढाकाराचे आणि केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.
महामंडळाच्या प्रशासकीय कामकाजासाठी सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असून, कार्यालयीन सुविधा अधिक आधुनिक आणि कर्मचारीस्नेही करण्यासाठी यापुढेही आवश्यक ती कामे हाती घेतली जातील, असे स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितले. नूतनीकरणामुळे प्रशासकीय व स्थापत्य विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळण्यास मदत होणार आहे.