Usha Nadkarni: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान; म्हणाल्या, ‘दुःख घरात ठेवून…’

Usha Nadkarni: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान; म्हणाल्या, ‘दुःख घरात ठेवून…’

Usha Nadkarni Jeevan Gaurav Award: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खाष्ट सासू म्हणून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni ) या नेहमीच काही ना काही कारणांमुळे जोरदार चर्चेत असतात. माहेरची साडी या मराठी चित्रपटामुळे त्या घराघरात प्रसिद्ध झाल्या. एक बिनधास्त्र, मोकळ्या मनाची आणि स्पष्टवक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदीत वेगवेगळ्या भूमिका वठवल्या आहेत. नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ (Jeevan Gaurav Award) प्रदान करण्यात आला.

त्यावेळी ते म्हणाल्या की, मी 78 वर्षांची आहे पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं. (Jeevan Gaurav Award 2024) पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ठ सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या. तुमच्या प्रमाणे मला देखील दुःख आहे. पण माणसाने आपले दुःख घरात ठेवावे अन् बाहेर मोकळे पणाने काम करावे. तरच तुम्ही आनंदी, उत्साही आणि चिरतरूण राहू शकता, अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केल्या.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे डॉ. संजय चोरडिया, सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, अलविरा मोशन एंटरटेनमेंट च्या दीपाली कांबळे, तरवडे इन्फ्राचे किशोर तरवडे, सोनू म्युझिकचे सोनू चव्हाण, सांस्कृतिक केंद्र विभाग ,पुणे मनपाचे अधिकारी राजेश कामठे, जेष्ठ गायक इकबाल दरबार, सुप्रिया हेंद्रे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)


पुरस्काराला उत्तर देताना उषा नाडकर्णी म्हणाल्या की, मुंबईतील शिवाजी मंदिर, ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी जसा नाटकाचं प्रयोग रंगतो तसा कोठेही रंगत नाही. आजपर्यंत अनेक नाटकं, चित्रपट, मालिका केल्या अन् इथून पुढील काळात देखील करत राहणार आहे. आजवरची कारकीर्द ही प्रेक्षकांमुळेच शक्य झाली कारण त्यांनी माझ्या कामावर प्रेम केलं. पण इतकं काम करून देखील आज ही आम्हाला आमचे मानधन निर्मात्यांकडून वेळेवर येत नाही. ही शोकांतिका आहे. या प्रकारात चित्रपट महामंडळाने लक्ष घालावे, अशी अपेक्षा उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक करताना मेघराजराजे भोसले म्हणाले की, एखाद्या रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा होणारा देशात हा एक वेगळा कार्यक्रम सोहळा आहे. गेली 16 वर्ष आम्ही हा वर्धापन दिन साजरा करत आहे. केवळ पुरस्कार देणे हा या कार्यक्रमांचा उद्देश नसून नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा देखील या कार्यक्रमांचा उद्देश आहे. या तीन दिवसांच्या काळात भक्तीगीतांपासून व्यावसायिक नाट्य, संगीत रजनी असे असंख्य कार्यक्रम बालगंधर्व परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.

Javed Akhtar : पद्मभूषण जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान

संजय चोरडिया म्हणाले, सर्व कलाकारांच एक तीर्थक्षेत्र असावं असे हे बालगंधर्व रंगमंदिर आहे. प्रत्येक कलाकाराला वाटतं की आपला एक तरी प्रयोग किंवा कार्यक्रम या रंगमंदिरात व्हावा. अन् येथे रंग मंचावर आल्यानंतर त्या प्रत्येक कलाकाराच जणू आयुष्यच बदलून जातं. अनेक कलाकारांच्या कारकिर्दीची सुरूवात येथून झाली आहे. त्याला हजारो, लाखो कलाकार साक्षीदार आहेत.

उल्हास पवार म्हणाले, उषा कलबाग ते उषा नाडकर्णी या उषा ताईंच्या जीवनपटात त्यांनी ‘गुरू’ पासून ‘पुरूष’ पर्यंत अनेक मोठ्या नाटकात भूमिका करून नाट्य सृष्टी गाजवली आहे. तसेच हिंदी पासून मराठी चित्रपटात देखील आपली मोहोर उमटवली आहे. अलीकडे शब्दांची स्वस्ताई झाली आहे. राजकारणात तर सम्राट, महर्षी, लोकप्रिय हे शब्द तर साधे झाले आहेत. पण कोणत्याही विशेषणाला चपखल ओळख बसेल उषा नाडकर्णी यांचे व्यक्तिमत्व आहे. यावेळी बोलताना उल्हास पवार यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या ‘नाट्यकलेची वाटचाल’ या विषयांवरील व्याख्यानाची आठवण देखील सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रसेन भवार यांनी केले तर आभार पराग चौधरी यांनी मानले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube