गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर, आशिष शेलारांची घोषणा…
मुंबई : १९५० व १९६० च्या दशकांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या आणि सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या असलेल्या मजरूह सुलतानपुरी (Majrooh Sultanpuri) यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार (Mohammad Rafi Lifetime Achievement Award) जाहीर झाला. तर हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक जावेद अली (Singer Javed Ali) यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२४ जाहीर झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष- मंत्री आशिष शेलार यांनी केली.
मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जीवनगौरव देण्यात येणार असून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव अंदलिब मजरूह सुलतानपुरी हे पुरस्कार स्वीकारतील.
आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव आणि मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाचे वर्ष हे मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.
तर पुरस्काराचे हे १८ वे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल-श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. तर ५१ हजार रूपये रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे.
मोहम्मद रफी यांचे कुटुंबिय मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून त्यांच्या उपस्थितीत दरवर्षी हा पुरस्काराचा शानदार सोहळा रंगशारदा येथे पार पडतो. मोहम्मद रफी यांच्या सोबत काम केलेल्या अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याने उत्तरोत्तर या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढत गेली.
यावर्षी गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि गायक जावेद अली यांना पुरस्कार जाहीर करताना आपल्याला अतिशय आनंद होतो आहे, असे आशिष शेलार म्हणाले. ते म्हणाले,
कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारे आणि त्याकाळी फिल्मफेअर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्काराने आणि प्रसिद्ध गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. रफी साहेबांचा १०० वा वाढदिवस असल्यामुळे त्यांचे जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व आहे.
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला, जाणून घ्या कारणे
वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार आहे.
यावेळी प्रसाद महाडकर यांच्या जीवनगाणीतर्फे फिर रफी या बहारदार मैफिलीत ख्यातनाम गायक श्रीकांत नारायण हे मोहम्मह रफी यांची अजरामर गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन रेडियो जॉकी असलेले आर. जे गौरव करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याच्या प्रवेशिका आशिष शेलार यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
यापुर्वी संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, सोनू निगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम, संगीतकार उषा खन्ना, गायक उदित नारायण या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.