नात्यातल्या उणीवेचं जीवनगाणं…
Marathi Film Tighi दोन बहिणी आणि आई मिळून तिघी. इतकं साधं समीकरण लेखक-दिग्दर्शक मांडत नाहीत. त्यांच्या जगण्याकडे ते एका तिरकस नजरेने पाहतात.
अमित भंडारी, सीईओ, सोहम डिजीटल :
फिल्म सुरू होते तेव्हा बगळ्यांमध्ये बसलेला एक कावळा उडून जातो… आणि ही फ्रेम का टिपली असेल, असे वाटत राहते. सिनेमा संपतो आणि त्या फ्रेममधील अर्थ आणि अन्वयार्थ आपल्याला उमगलेला असतो… एक वर्तुळ पूर्ण होते.
काही जखमा या भरून आलेल्या असतात… पण तरीही नात्यांमधील बिटविन द लाइन्स मधून काहीतरी निसटलेले असते. नेमके हेच टिपण्याचा प्रयत्न जिजीविशा काळे या उदयोन्मुख दिग्दर्शिकेने केला आहे. जगण्यात नेमकं काय खुपतं आहे… काय हरवलं आहे आणि काय गमावलं आहे, याचा जमाखर्च मांडताना आपल्याला जाणवते. भोवतालच्या वेगाशी जुळवून घेताना कधी त्रास होतो… तर कधी जुळवून घेतो.. पण या प्रक्रियेत काही क्षण निसटतात… तर काही माणसं… जगणं सुरू राहतं अव्याहतपणे आणि सरत्या काळानुसार आपण काहीसे बदलत जातो…
दोन बहिणी आणि आई मिळून तिघी. इतकं साधं समीकरण लेखक-दिग्दर्शक मांडत नाहीत. त्यांच्या जगण्याकडे ते एका तिरकस नजरेने पाहतात. वाढत्या वयानुसार नात्यांमधील होत जाणारे बदल, भोवतालची बदललेली परिस्थिती आणि त्यानुसार परस्परांमधील नातं आपसूक बदलत जातं… त्याची ही गोष्ट आहे.
ही गोष्ट आहे जगण्याची… त्यातील संघर्षाची… त्यामधील घुसमटीची… परिस्थितीशी जुळवून घेण्यातील adjustment ची आणि कुठल्याही नात्याकडे निरपेक्षपणे पाहता येतं का, याची तपासणी करून पाहण्याची…
सोनाली आणि नेहा या दोन बहिणींमधील असणारी दरी, त्यासाठी कारणीभूत ठरलेले प्रश्न, नेहाच्या लग्नानंतर दोघींमध्ये वाढलेलं अंतर … या सगळ्या गोष्टींना आईच्या आजारपणाची पार्श्वभूमी आहे. त्यामध्ये आईच्या संस्कारांच्या मुशीत झालेली जडणघडण आणि जगण्याशी दोन हात करताना मनाशी सुरू असणारे द्वंद्व … या सगळ्यांचा पेंडुलम लेखक आणि दिग्दर्शिकेने उत्तम प्रकारे हलता ठेवला आहे.
भारती आचरेकर यांनी साकारलेली आई भन्नाट आहे. तिची मूल्ये आणि तत्त्वप्रणाली या सगळ्यात जगण्याची बूज कशी राखतात, हे पाहताना जाणवतं की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वयंपूर्ण आणि स्वतंत्रपणे जगण्यासाठी किंमत मोजावी लागते. पण तत्त्वांशी तडजोड करण्यापेक्षा ताठ मानेने जगणे अधिक महत्त्वाचे आहे. संघर्ष करताना किंमत मोजावी लागते; पण आत्मसन्मानाची किंमत मोजून नाही.
या गाभ्यावर या जगण्याच्या गाण्याची सम येते तेव्हा अनवट चालीचे गाणे ओठांवर रुळू लागते.
जगण्याला अर्थ देताना आपल्या स्वत्वाचं जतन करणं किती गरजेचं आहे, हे हा सिनेमा अधोरेखित करतो. आजच्या भौतिक सुखांच्या मागे धावत असताना स्वतःचं म्हणणं ठामपणे मांडणारा हा सिनेमा स्वतःचं वेगळेपण सिद्ध करतो.
जिजीविशा काळे हिच्या लिखाणात गंमत आहे. माणसांकडे बारकाईने पाहून त्यांच्या गुणदोषांसकट त्यांना पडद्यावर उतरवण्यामधील undercurrent वेगळा आहे. त्याला निखिल महाजन यांच्या पटकथेची जोड मिळाल्याने गोष्ट अधिक खुलली आहे. नाजूक विषय तिने अत्यंत समंजसपणे हाताळला आहे. त्यामधील बाप-मुलीच्या नात्याकडे पाहण्याचा टॅन्जंट अँगल ती देते आणि तिथे आपण गडबडून जातो, गोंधळून जातो.
यासोबतच मिलिंद जोग यांचा कॅमेरा अधिक बहारदार आहे. बाहेर कोसळणारा पाऊस, काचेवरून ओघळणारं पाणी आणि भावविवश असणारी सोनाली. .ही दृश्यं आणि अशा अनेक फ्रेम्स मनात रुतून बसतात.
प्राजक्त देशमुख यांचे संवाद नेमके आणि मोजके आहेत. त्यांच्या साधेपणात, छोट्या वाक्यांमधून आशय आणि त्यातील अर्थगर्भता पोहोचवण्याची ताकद आहे. नात्यांचा बदलता पोत पात्रांना त्यांचं अस्तित्व बहाल करण्यात मोठी भूमिका बजावतो.
भारती आचरेकर या किती सशक्त आणि समंजस अभिनेत्री आहेत,याचा नव्याने प्रत्यय येतो. जगण्याच्या या प्रवाहात स्वतःच्या तत्त्वांशी इमान राखत परिस्थितीशी संघर्ष करत एकटीने दोन मुली वाढवणाऱ्या खमक्या स्त्री चा हा प्रवास भारती आचरेकरांनी खूप सक्षमपणे दाखवला आहे. काही इमोशनल सीन्स अधिक पसरले असते पण भावनांचा उद्रेक न होऊ देता ते किती संयतपणे अधिक प्रभावीपणे दाखवता येऊ शकतात, हे भारतीय सूर्यकारांच्या या सिनेमातील अभिनयाकडे पाहून लक्षात येतं…
उत्तरार्धात सोनाली आणि नेहा सोबत तिचे असणारे emotional sequences येतात. तेव्हा जाणवतं की ती किती ताकदीची अभिनेत्री आहे. तिच्यासमोर काम करताना सोनाली आणि नेहा यांचा कस लागला आहे, याची वारंवार प्रचिती येते.
नेहा पेंडसे हिने साकारलेली मोठी बहीण … तिच्यातील समंजसपणा आणि between the lines मधील नेमकेपणा टिपण्याचे आव्हान तिने समर्थपणे पेलले आहे. तिचे आणि जेमिनी पाठक यांच्यातील सीक्वेन्सेस आणि पुष्कराज चिरपुटकरसोबतचे काही सीन तिची समज दाखवतात. June वगळता आत्तापर्यंत तिचं काम दिसण्यावर बऱ्यापैकी अवलंबून होतं; पण या सिनेमात तिने साकारलेल्या बहिणीला आणि मुलीला अधिक सघनता आहे.
सोनाली कुलकर्णीचे आतापर्यंतचे काम आणि या सिनेमातील तिचा अभिनय — अभिनेत्री म्हणून तिची नव्याने ओळख निर्माण करेल. तिचा त्रागा, चिडचिड आणि त्यापलीकडे जाऊन केलेले आत्मपरीक्षण — आणि त्यानंतर समजून-उमजून केलेले सीन … यामध्ये सोनालीचे अधिक polished version अनुभवायला मिळते.
कडकनाथ हे पात्रही चांगलंच लक्षात राहतं.
वखवखलेल्या नजरेने पाहणारा जेमिनी पाठकने साकारलेला बॉसही लक्षात राहतो. परिस्थितीमुळे हतबल झालेला आणि पत्नीवर सर्वार्थाने अवलंबून असलेला नवरा … पुष्कराज चिरपुटकरने योग्यरीत्या साकारला आहे. तसेच निपुण धर्माधिकारीने समजून-उमजून साकारलेला मित्र हा त्रयस्थ असूनही आपलाच वाटतो आणि नात्यांच्या उंबरठ्यावरचं सांधलेपण जपतो.
सुव्रत जोशीचे अगदी मोजके सीन आहेत; पण त्या सीनमध्ये तो आपली छाप सोडून जातो. मृण्मयी गोडबोलेचा करारीपणा लक्षात राहतो. अबोल असला तरी देहबोलीतून बरंच काही सांगणारा संजय मोने सारखा कसलेला अभिनेता आपल्या अस्तित्वानेच काळजाला भिडतो.
अद्वैत नेमळेकर आणि निलेश मोहरीर यांच्या संगीतात पारंपरिक सुरावट आहे, आणि त्यासाठी केलेला instrumentation चा बाज काळजाचा ठाव घेतो. जितेंद्र जोशीचे गाण्याचे बोल भावविभोर करतात.
जगण्यातील रिकाम्या जागा कधी क्षणांच्या असतात… तर कधी माणसांच्या अस्तित्वाच्या. जितका श्वासोच्छ्वास सहज होतो, तितकंच जगणं अवघड असतं. प्रत्येक टप्प्यावरच्या परीक्षेतून तरून जाताना जगण्याचा कस लागतो… आणि त्यातून आपण तावून-सुलाखून निघतो. ही प्रक्रिया जिजीविशा काळे हिने पहिल्याच प्रयत्नात उत्तम प्रकारे टिपली आहे.
नेमकं काय हवंय या प्रश्नाभोवती फिरत राहताना परिस्थिती आपल्याला नेहमी आपल्या आवडीचा पर्याय देतच असेल असं नाही. अशा वेळी तत्त्वांशी तडजोड न करता परिस्थितीशी दोन हात करण्याचं बळ हा सिनेमा देतो.
निखिल महाजन याचे विशेष कौतुक कारण त्याने त्यांच्या सहाय्यक दिग्दर्शिकेला दिग्दर्शनाची संधी दिली. तसेच निर्माते सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे या निर्मात्याचेही कौतुक करावे लागेल.
हा सिनेमा का बघावा?
कितीही कठीण प्रसंग आला तरी तत्त्वांची बूज राखत परिस्थितीशी संघर्ष करण्याचं बळ देणारा आणि नात्यांचे अलगद पदर उलगडणारा सिनेमा म्हणून.
का टाळावा?
थोडासा dramatic आणि emotional roller coaster — काही प्रश्न अनुत्तरित ठेवतो.
थोडक्यात काय?
नात्यातल्या उणीवेचं जीवनगाणं…
या सिनेमाला मी देतोय :- तीन स्टार्स.
⭐⭐⭐
