‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’चे मराठी ओटीटी विश्वात लवकरच होणार पदार्पण!

"स्वतंत्र आणि प्रयोगशील मराठी चित्रपट निर्मात्यांना बळ देणारे ''नाफा स्ट्रीम" पहिले परदेशी व्यासपीठ! संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप

  • Written By: Published:
Untitled Design   2025 12 18T200329.450

‘North American Film Association’ to debut in Marathi OTT world soon! : ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ अर्थात ‘नाफा’ (NAFA) या संस्थेची स्थापना 2024 मध्ये अमेरिकास्थित उद्योजक, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप(Abhijeet Gholap) यांच्या संकल्पनेतून झाली आहे. नाफाने 2024 पासून ‘मराठी चित्रपट महोत्सवा’द्वारे आणि भारतात प्रदर्शित होणाऱ्या तारखेलाच नवे चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित करून मराठी चित्रपटसृष्टीच्या कक्षा रुंदावल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा न घेणारी, स्वयंसेवकाच्या उत्साह आणि मेहनतीवर नावारुपाला आलेली ही संस्था अर्थात ‘नो प्रोफीट ओर्गनायझेशन’ येत्या नवीन वर्षात आपले मराठी ओटीटी(Marathi OTT) सुरु करणार आहे.

‘नाफा स्ट्रीम'(NAFA STREAM) बद्दल बोलताना संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप म्हणाले, ‘नाफा स्ट्रीम’ हे ओटीटी प्लॅटफॉर्म स्वतंत्र आणि प्रयोगशील मराठी चित्रपट निर्मात्यांना आधार देणारे विदेशातील पहिले सामर्थ्यशाली माध्यम ठरणार आहे. प्रतिष्ठित तसेच उदयोन्मुख कलावंतांसाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ असून, गेल्या पाच – सहा दशकांतील निवडक, अभिजात आणि दर्जेदार मराठी चित्रपट नॉर्थ अमेरिकन प्रेक्षकांसाठी एकाच व्यासपीठावर उपलब्ध असणे ही त्यांच्यासाठी पर्वणी असेल. या सोबतच चित्रपट निर्मात्यांसाठी पारदर्शक महसूल – वाटप मॉडेल विकसित करण्याचा ‘नाफा’ प्रयत्न करीत आहे. आज अनेक निर्माते आपली संपूर्ण पुंजी खर्चून, कुटुंबाची स्वप्ने बाजूला ठेवून, फक्त आपल्या कलाकृतीवरच्या प्रेमासाठी चित्रपट बनवतात. परंतु त्यांना योग्य मंच आणि योग्य परतावा फार क्वचित मिळतो. म्हणूनच ‘नाफा’ या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून ‘नाफा स्ट्रीम’ ओटीटीच्या माध्यमातून एक नावीन्यपूर्ण ‘इकोसिस्टम’ विकसित करण्यासाठी उत्सुक आहे.”

पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा पक्षाला रामराम, लवकरच भाजपमध्य प्रवेश?

‘नाफा स्ट्रीम’ प्रोजेक्ट लीड अर्चना सराफ म्हणाल्या, “गेल्या दोन – अडीच वर्षांत ‘नाफा’ने अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मनात विलक्षण स्थान निर्माण केले आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांचे प्रदर्शन, महोत्सव, पुरस्कार सोहळे आयोजित करून निष्ठावान प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. ‘नाफा’चे ओटीटी पदार्पण निश्चितच मराठी मनोरंजनाला नवी उंची देईल. खास ‘नॉर्थ अमेरिकन’ चोखंदळ प्रेक्षकांसाठी ‘नाफा स्ट्रीम’ ओटीटी असून महाराष्ट्रातील निर्माते – कलावंतांनी आमच्याशी थेट संपर्क केल्यास त्यांच्या कलाकृतींचा प्राधान्याने विचार केला जाईल.”

‘नाफा स्ट्रीम’ (NAFA STREAM) या ओटीटीवर नॉर्थ अमेरिकेतील प्रेक्षकांना गेल्या काही दशकांतील ‘कल्ट क्लासिक’ अर्थात प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलेले मराठी चित्रपट, नवे चित्रपट, वादविवादामुळे, सेंसॉर मंजुरी न मिळालेले अथवा वितरणाच्या अडचणींमुळे आजवर प्रदर्शित न होऊ शकलेले दर्जेदार आशयघन चित्रपट, विविध विषयांवरील डॉक्युमेंट्रीज, वेबसीरिज, म्युझिक अल्बम्स, गाजलेल्या मराठी मालिका आणि बरेच काही एकाच प्लॅटफॉर्मवर नॉर्थ अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

सध्या मराठी चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असणारी, त्यांना आर्थिक महसूल मिळवून देणारी अत्यल्प माध्यमे, संस्था कार्यरत आहेत. ‘नाफा स्ट्रीम’ OTT मुळे निर्मात्यांसाठी ही यापूर्वी कधीच उपलब्ध नसणारी अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. ‘नाफा’ने निर्मात्यांचा विचार करून योग्य सन्मान करणारी इकोसिस्टम निर्माण करावी अशी अपेक्षा असणार आहे.

follow us