“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

Chhagan Bhujbal : मुंबई येथे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले या चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली आहे. दिग्दर्शक अनंत महादेवन (Anant Mahadevan) , निर्माते अनुया चौहान कुडेचा (Anuya Chauhan Kude) , निर्माते रितेश कुडेचा (Ritesh Kude) आणि सह निर्माते रोहन गोडांबे (Rohan Godambe) यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली.
तर यावेळी प्रत्येक चित्रपट तयार होताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेत असतो मात्र या चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट बनविण्यात आला असल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित हिंदी मध्ये हा चित्रपट येत आहे. त्यावर दिग्दर्शक आणि बाकी मंडळींनी बरीच मेहनत घेतल्याचे दिसते आहे त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पाहिलाच पाहिजे महात्मा फुलेंचं कार्य हे देशभर नाही तर जगभर आपण पोहोचवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
11 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Krantijyoti Savitribai Phule) यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे.
दिग्दर्शक आणि कलाकारांचं उत्तम सादरीकरण
या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. महात्मा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधी (Prateik Gandhi) दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही ऐतिहासिक पात्रं जिवंत होतील, असा विश्वास आहे. विनय पाठक हेदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.