नीट आंदोलनावरील पोस्टमुळे सलमान खान ट्रोल; जो डर गया वो मर गया म्हणत दिले उत्तर

काहींनी त्याच्यावर भूमिका बदलल्याचा आरोप केला, तर काहींनी त्याच्यावर सरकारच्या बाजूने बोलत असल्याची टीकाही केली.

  • Written By: Published:
Untitled Design (97)

Salman Khan troll : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली असतानाच अभिनेता सलमान खान सोशल मीडियावरील एका नव्या वादामुळे चर्चेत आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत त्याने केलेल्या दोन पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून अनेकांनी त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या वादादरम्यान सलमानने शेअर केलेल्या एका नव्या पोस्टने पुन्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानने सुरूवातीला आपल्या बालपणीचा फोटो शेअर करत विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्याने आपल्या पोस्टमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबद्दल खेड व्यक्त करत जखमी झालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय असून देशातील विद्यार्थी चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आले आहेत आणि त्यांच्य पालकांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे, असे त्याने म्हटले होते.

मात्र काही वेळानंतर सलमानने आणखी एक पोस्ट करत विद्यार्थ्यांना आंदोलन थांबवून घरी परतण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी खात्री व्यक्त करत त्याने पंतप्रधानांनी या प्रकरणाची दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे आणि घरी परतावे असे त्याने आवाहन केले होते.

Sonam Wangchuk : केंद्र सरकारशी डील केली? स्पष्टीकरण देत सोनम वांगचुक ट्रोलर्सवर संतापले

सलमानच्या या दोन पोस्टमधील संदेश वेगवेगळे असल्याचे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांना वाटले. त्यामुळे काहींनी त्याच्यावर भूमिका बदलल्याचा आरोप केला, तर काहींनी त्याच्यावर सरकारच्या बाजूने बोलत असल्याची टीकाही केली. या टीकेनंतर सलमानने ट्रोलर्सना थेट उत्तर देण्याऐवजी जिममधील शर्टलेस सेल्फी शेअर केला. या फोटोसोबत त्याने, सलमान खान डर गया… हम्म्म… जो डर गया वो मर गया, असे कॅप्शन लिहिले.

सलमानची ही पोस्ट काही क्षणांतच व्हायरल झाली आणि त्यावर प्रतिक्रियाांचा अक्षरशः पाऊस पडला. एका वापरकर्त्याने त्याला टोला लगावत, आता पुरे झाले, थोडा कणा दाखव, अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्याने, सरकारकडून या पोस्टसाठी किती पैसे मिळाले? असा प्रश्न उपस्थित केला. तर काही चाहत्यांनी सलमानचे समर्थन करत, तो कोणालाही घाबरत नाही, म्हणूनच तो भाई आहे, अशा प्रतिक्रिया दिल्या. काहींनी संपूर्ण घडामोडींवर प्रश्न उपस्थित करत, परिस्थिती इतक्या लवकर कशी बदलली? असेही विचारले. तर एका चाहत्याने सलमानचा हेतू कोणाशी संघर्ष करणे नसून लोकांना योग्य दिशा दाखवण्याचा असल्याचे म्हटले.

मात्र काही वापरकर्ते अजूनही साशंक असून, जर तुम्ही घाबरला नव्हता तर पहिल्या पोस्टनंतर पुन्हा दुसरी पोस्ट का केली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी आंदोलनावरील सलमान खानची भूमिका आणि त्यानंतरची त्याची प्रतिक्रिया यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून अभिनेता पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.

follow us