गोंधळ’चे दिग्दर्शक संतोष डावखर सर्पमित्राच्या भूमिकेत!

लोक सापाला फक्त धोक्याच्या दृष्टीने पाहातात, पण प्रत्यक्षात साप आपल्यावर हल्ला करायला पुढे येत नाहीत.

News Photo   2026 04 10T180248.579

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी (Movie) सन्मानित ‘गोंधळ’ चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर साधारण दहा वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यामध्ये ते सापांचे रेस्क्यू करताना दिसत आहेत. पडद्यामागे कथा घडवणारा दिग्दर्शक प्रत्यक्ष आयुष्यात सर्पमित्र म्हणून कार्यरत असल्याचे पाहून नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नवी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दहा वर्षांपूर्वीच्या या व्हिडिओमध्ये संतोष डावखर अत्यंत शांतपणे आणि कौशल्याने साप हाताळताना दिसतात. कोणतीही घाईगडबड किंवा भीती न दाखवता, सापाला कोणतीही इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेत ते त्याला सुरक्षितपणे पकडतात. त्यांच्या या कार्याचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

संतोष डावखर हे डोंबिवलीस्थित ‘नेचर सेव्ह सोसायटी’ या कल्याण डोंबिवली मधील संस्थेशी जोडलेले असून, सचिन जोशी या संस्थेचे अध्यक्ष आहेत. सापांबद्दलची भीती दूर करण्यासाठी आणि निसर्ग संवर्धनासाठी ते सक्रियपणे कार्यरत आहेत.

धुरंधर 2 चे दिग्दर्शक आदित्य धर यांनी प्रभास यांना लेजेंड म्हटलं

२०१५ पर्यंत या टीमने केडीएमसी परिसरातून अधिकृतरीत्या ८५०० हून अधिक सापांचे पुनर्वसन येऊर नॅशनल पार्क, मानकोली फॉरेस्ट, कर्नाळा अभयारण्य आणि बोरीवली नॅशनल पार्क परिसरात केले आहे. अनेकदा वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिके घेतली जातात. विद्यार्थ्यांना सापांविषयी योग्य माहिती, प्रथमोपचाराची माहिती आणि पर्यावरणातील त्यांचे महत्त्व याबद्दल जागरूक केले जाते.

याबद्दल संतोष डावखर यांच्या मते , ” भारतात जन्मलेल्या प्रत्येक सजीवाला, मग तो माणूस असो, प्राणी असो किंवा अगदी सूक्ष्म जीव. या सर्वांचा निसर्गसंपत्तीवर तितकाच हक्क आहे. प्रत्येकाला या भूमीवर जगण्याचा अधिकार आहे. साप हा अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जर ही साखळी कोलमडली, तर त्याचे दूरगामी परिणाम पर्यावरणावर होऊ शकतात. त्यामुळे अन्नसाखळीतील महत्वाचा घटक साप आणि असेच निगडित असलेले सर्व जीव वाचवणे अत्यंत आवश्यक आहे.

लोक सापाला फक्त धोक्याच्या दृष्टीने पाहातात, पण प्रत्यक्षात साप आपल्यावर हल्ला करायला पुढे येत नाहीत. आपण भीतीपोटी चुकीच्या प्रतिक्रिया देतो. योग्य पद्धतीने हाताळलं, तर सापांनाही वाचवता येतं आणि माणसांनाही सुरक्षित ठेवता येतं. त्यामुळे साप दिसल्यास घाबरण्यापेक्षा सर्पमित्रांना बोलावणं आणि त्याला सुरक्षित ठिकाणी सोडणं हेच योग्य आहे. आमच्या संस्थेमार्फत शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सापांविषयी जागरूक केलं जातं. त्यासाठी नेचर सेव्ह सोसायटी शाळेत जाऊन, साप आणि त्यांचे निसर्गातील महत्व याबद्दलची संपूर्ण माहिती देते.

साप विषारी, बिन विषारी कसा ओळखावा. साप चावल्यास प्रथमोपचार कसा करावा, साप ओळखण्याची प्राथमिक माहिती आणि पर्यावरणातील त्यांचं स्थान याबद्दल मार्गदर्शन केलं जातं. विद्यार्थ्यांना बिन विषारी साप हातात हाताळण्यास देणे, तसेच या माध्यमातून भीती व अंधश्रद्धे ऐवजी जागरूकता निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो.” मात्र माहिती नसताना साप कोणीही हाताळू नये कारण बरेच सर्पमित्र साप पकडताना अपघाताने सर्पदंश होऊन ॲन्टिव्हेनम न मिळाल्यामुळे जीवाला मुकले आहेत.

जर सर्पदंश झालाच, तो विषारी असो वा बिन विषारी त्वरीत जवळच्या सरकारी रुग्णालयात धाव घ्या. कारण हे ॲन्टिव्हेनम केवळ सरकारी रुग्णालयातच उपलब्ध असतात. बाहेर ते महाग असतात. त्यामुळे नेहमीच काळजी घ्यावी, असे आवाहनही संतोष डावखर करतात.

या व्हिडिओमुळे संतोष डावखर यांची एक वेगळीच ओळख समोर आली आहे. चित्रपटांच्या माध्यमातून कथा सांगणारे दिग्दर्शक प्रत्यक्ष आयुष्यात मात्र निसर्गाशी जोडलेली खरी गोष्ट जगताना दिसत आहेत. त्यांच्या या अनोख्या कार्यामुळे ‘गोंधळ’चे दिग्दर्शक आता सोशल मीडियावर ‘रिअल लाइफ हिरो’ म्हणून चर्चेत आले आहेत.

Tags

follow us