‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ची म्युझिक ट्रीट, ‘नक्षत्रांचे देणे’ या अजरामर गीताचे भावनिक रूप प्रेक्षकांसमोर
नुकतेच या चित्रपटातील गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्राचे देणे हे अजरामर गीत नव्या रूपात प्रदर्शित झाले आहे.
The emotional version of the immortal song : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रभर प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असताना, कथा आणि अभिनय यांच्यासोबतच चित्रपटातील गाणीही संगीतप्रेमींसाठी एक वेगळीच म्युझिकल ट्रीट ठरत आहेत. नुकतेच या चित्रपटातील गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्राचे देणे हे अजरामर गीत नव्या रूपात प्रदर्शित झाले आहे. आशा भोसले यांनी मूळ गायलेले हे गीत जावेद अली यांच्या भावस्पर्शी आवाजात नव्या स्वरूपात सादर झाले असून, आरती प्रभू यांच्या शब्दांना देवदत्त मनीषा बाजी यांच्या संगीताची साथ लाभली आहे. मनातील घालमेल आणि अंतर्मुख भाव या गाण्यात प्रकर्षाने जाणवतात. आयुष्यात आलेल्या आव्हानांमुळे खचलेल्या दोघींची कहाणी यात उलगडत आहे.
हा चित्रपट नात्यांमधील भावबंध, सूक्ष्म भावना आणि घराघरात घडणाऱ्या प्रसंगांना स्पर्श करणारा आहे आणि त्याच भावविश्वाला साजेशी अशी त्याची गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. विशेष म्हणजे, मराठी संगीतातील काही अजरामर गीतांना आजच्या काळाशी सुसंगत, तरीही त्यांचा मूळ आत्मा जपून नव्याने सादर करण्यात आली आहेत. यापूर्वीही या चित्रपटातील अशीच दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत, जी संगीतप्रेमींच्या मनात घर करत आहेत.
‘दिवस तुझे हे फुलायचे’ हे यशवंत देव यांचे अजरामर गीत आजच्या काळात नव्या संवेदनशीलतेने सादर झाले आहे. मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांना कुणाल गांजावाला यांच्या परिपक्व आवाजाची साथ लाभली असून, सूरज धीरज यांच्या संगीतामुळे हे गाणे अधिकच भावपूर्ण झाले आहे. आई होण्याच्या प्रवासातील आनंद, हळवे क्षण आणि सासू-सुनेमधील प्रेमळ नातेसंबंध या गाण्यात अतिशय सुंदरपणे उमटतात.
मोठी बातमी! महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोर्टानंतर इडीकडून भुजबळांना दिलासा
‘डाव मोडू नको’ या सुधीर फडके आणि राम फाटक यांच्या अजरामर गाण्यालाही चित्रपटातून नवसंजीवनी मिळाली आहे. वैशाली सामंत यांच्या आवाजात सादर झालेले हे गाणे, घरातील गैरसमज, न बोललेल्या भावना आणि रुसवे-फुगवे यांचे हळवे प्रतिबिंब दाखवते. आधुनिक संगीतसाज असूनही मूळ भाव कायम ठेवण्यात यश आले आहे. या तिन्ही गाण्यांसोबतच चित्रपटाचा टायटल ट्रॅकही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून, सध्या तो सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यावर अनेक रील्स तयार होत असून, चित्रपटाची लोकप्रियता अधिक वाढताना दिसत आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यामते, ही गाणी केवळ प्रसिद्ध म्हणून घेतलेली नाहीत, तर त्या-त्या प्रसंगाला ती अत्यंत चपखल बसतात. काही भावना शब्दांपेक्षा संगीतामधून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात, आणि हेच या चित्रपटातील गाण्यांचे वैशिष्ट्य आहे. एकूणच, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ हा चित्रपट नात्यांची गोष्ट सांगतानाच, जुन्या अजरामर गीतांच्या नव्या मांडणीतून मराठी संगीतप्रेमींना एक समृद्ध आणि भावपूर्ण म्युझिकल अनुभव देतो.
झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर आणि सना शिंदे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
