Iran-USA War : युद्ध आणि शेअर बाजार : रणांगणावरील गोळीबारात बाजार पडतो की सावरतो?
War & Indian Share Market युद्धाची पहिली ठिणगी पडताच बाजारात 'अनिश्चितता' निर्माण होते. गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात.
Iran US War & Indian Share Market : युद्ध आणि शेअर बाजार यांचा संबंध खूप गुंतागुंतीचा पण रंजक आहे. जेव्हा रणशिंग फुंकले जाते, तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असते, पण इतिहास सांगतो की बाजार या धक्क्यातून सावरतोच. युद्धाची पहिली ठिणगी पडताच बाजारात ‘अनिश्चितता’ निर्माण होते. गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे म्हणजेच ‘सोन्या’कडे वळतात. त्यात सध्या इराण-अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. चला तर, यापूर्वीच्या काही प्रमुख युद्धांच्यावेळी अमेरिका आणि भारतीय शेअर बाजार कसा होता त्याबद्दल जाणून घेऊया…
युद्धाची ठिणगी पडताच पहिल्यांदा काय घडतं तर, सर्वात पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, महागाईचा धोका निर्माण होतो तसेच पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत होते. आता तुम्हाला नवल वाटेल, पण अनेकदा युद्धाच्या काळात संरक्षणाशी संबंधित (Defense Stocks) कंपन्यांना मोठी ऑर्डर मिळते. सरकारी खर्च वाढतो, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळू लागतो.
1962 चं भारत चीन युद्ध
1962 चे भारत-चीन युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत कठीण आणि भावनिक वळण होते. या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि तत्कालीन शेअर बाजारावर झालेला परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्याकाळी आज सारखा विकसित शेअर बाजार नव्हता, पण आर्थिक पडसाद मात्र खोलवर उमटले होते.
1962 चे वर्ष… भारत नुकताच स्वातंत्र्याची पंधरा वर्षे साजरी करत होता. ‘हिंदी-चिनी भाई-भाई’च्या घोषणा घुमत होत्या, पण 20 ऑक्टोबर 1962 रोजी हिमालयाच्या कुशीत अचानक तोफा धडाडल्या. चीनने भारतावर आक्रमण केले. हे केवळ सीमेवरचे युद्ध नव्हते, तर एका तरुण लोकशाहीच्या अर्थव्यवस्थेवर झालेला तो मोठा प्रहार होता. त्याकाळी आजसारखे ‘सेन्सेक्स’ किंवा ‘निफ्टी’ अस्तित्वात नव्हते.
भारत आणि चीनमधील युद्धाची बातमी येताच गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड घबराट पसरली. त्यामुळे टाटा स्टील, एसीसी (ACC) यांसारख्या त्यावेळच्या बड्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडले. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, काही काळासाठी शेअर बाजारातील व्यवहार स्थगित करावे लागले होते. अनिश्चिततेमुळे लोक रोकड (Cash) जवळ ठेवण्याला प्राधान्य देऊ लागले.
युद्धकाळात सोनं हाच एकमेव आधार
युद्धामुळे शेअर बाजार पडलेला असताना ‘सोने’ हाच एकमेव आधार वाटत होता. त्यामुळे युद्धकाळात पैसा उभा करण्यासाठी सरकारने जनतेला आवाहन केले. तेव्हा पहिल्यांदा ‘नॅशनल डिफेन्स बाँड्स’ आणि ‘गोल्ड बाँड्स’ आणले गेले. त्यावेळी भारतीय महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने देशासाठी दान केले, हे या युद्धाचे सर्वात भावनिक चित्र होते.
त्यानंतर 21 नोव्हेंबर 1962 रोजी चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केला. युद्ध थांबल्यानंतर बाजार हळूहळू सावरला. पण या युद्धाने भारताला एक धडा दिला तो म्हणजे ‘आर्थिक स्वावलंबन आणि लष्करी सज्जता’. यानंतरच्या काळात भारताने संरक्षण क्षेत्रातील स्वदेशी उत्पादनांवर भर दिला, ज्याचा फायदा पुढे अनेक कंपन्यांना झाला.

1962 चं युद्ध हे भारतीय शेअर बाजारासाठी एक ‘ब्लॅक स्वॉन’ इव्हेंट होतं. यातून आपण शिकलो की, भू-राजकीय तणाव (Geopolitical Tension) हा बाजाराचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यानंतर 1997 साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले. युद्ध सुरू होण्यापूर्वी बाजारात अनिश्चिततेमुळे काहीशी घसरण झाली मात्र, युद्ध केवळ 13 दिवस चालले आणि भारताचा निर्णायक विजय झाला. भारताच्या विजयामुळे आणि दक्षिण आशियात भारताचे वर्चस्व निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि युद्ध संपल्यानंतर बाजारात तेजी पाहायला मिळाली.
यानंतर 1999 मध्ये कारगिल युद्ध झालं हे युद्ध मे 1999 ते जुलै 1999 या काळात झाले. यादरम्यान सेन्सेक्स अस्तित्वात होता. जेव्हा युद्धाची ठिणगी पडली तेव्हा सेन्सेक्समध्ये मोठी घसरण झाली. त्यावेळी बाजार सुमारे 10 ते 12 % पर्यंत खाली आला होता. मात्र, जसजसे भारतीय सैन्याने टायगर हिल आणि इतर शिखरांवर ताबा मिळवला, तसतसा बाजार सावरू लागला. 26 जुलै 1999 म्हणजेच कारगिल विजय दिवसापर्यंत सेन्सेक्सने युद्ध सुरू होण्यापूर्वीची पातळी ओलांडली होती. युद्ध संपल्यानंतर पुढच्या काही महिन्यांत बाजाराने 30 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला.
“Buy on the cannons, sell on the trumpets.” अर्थात, जेव्हा युद्धाच्या तोफा धडाडतात तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा विजयाचे बिगुल वाजते म्हणजेच सगळं आलबेल होतं तेव्हा विक्री करा असे प्रसिद्ध गुंतवणूकदार नॅथन रॉथचाइल्ड यांचं वाक्य आहे. त्यामुळे आतापर्यंतचा इतिहास बघता प्रत्येक युद्धाच्या धक्क्यातून भारत आणि भारतीय बाजार अधिक मजबूत होऊन बाहेर पडले आहेत.
