देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी, ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार
‘देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी’ या दमदार टॅगलाईनसह ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार आहे.
The ‘Fauji’s’ patriotic roar : स्वातंत्र्यदिन म्हणजे केवळ उत्सव नाही, तर त्यामागे असलेल्या असंख्य शूरवीरांच्या त्यागाची आणि बलिदानाची जाणीव करून देणारा अभिमानाचा क्षण! सीमेवर जीवाची पर्वा न करता मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या जवानांच्या शौर्याला आणि निस्सीम देशसेवेला रुपेरी पडद्यावर सलाम करणारा एकलव्य प्रतिष्ठान, सुधीरदादा पाटसकर प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विशेष चर्चेत आला आहे. ‘देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी’ या दमदार टॅगलाईनसह ‘फौजी’ची देशभक्तीची गर्जना 27 नोव्हेंबरपासून रुपेरी पडद्यावर घुमणार आहे. या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन ह.भ.प. घनशाम विष्णुपंत येडे यांनी केले आहे. सौ. स्वप्रजा विश्वनाथ नाथ या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत.
देशप्रेम, शौर्य आणि मातृभूमीशी असलेली नाळ यांची प्रभावी झलक दाखवणाऱ्या ‘फौजी’ या आगामी मराठी चित्रपटाचा दमदार लुक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या धैर्याची, त्यागाची आणि भावविश्वाची अंगावर काटा आणणारी कहाणी मांडणाऱ्या या चित्रपटात दोन जवानांच्या आयुष्याचा प्रवास केंद्रस्थानी आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणाऱ्या या वीरांची देशसेवा, संघर्ष आणि भावनिक प्रवास ‘फौजी’मधून प्रभावीपणे उलगडणार आहे.
मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांना सरकारचा संदेश; कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही
सहनिर्मात्या सौ. स्वप्नजा विश्वनाथ नाथ म्हणाल्या, ‘देशासाठी स्वतःचा देह झिजवणाऱ्या त्या तमाम योद्ध्यांचे अश्रू, त्याग आणि त्यांच्या कुटुंबीयांची तगमग जेव्हा रुपेरी पडद्यावर साकारते, तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते आणि डोळे नकळत पाणावतात. ‘फौजी’ हा केवळ चित्रपट नाही, तर मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रत्येक जवानाच्या शौर्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाला वाहिलेली भावपूर्ण मानवंदना आहे.
दिग्दर्शक ह.भ.प. घनशाम विष्णुपंत येडे म्हणाले. ‘सीमेवर बंदूक हातात घेऊन उभा असलेला जवान हा केवळ एक सैनिक नसतो, तर त्याच्या मागे त्याचे कुटुंब, नाती, स्वप्नं आणि मातृभूमीविषयीची अपार निष्ठा असते. हीच भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही ‘फौजी’च्या माध्यमातून केला आहे. ‘देशासाठी.. धर्मासाठी.. मातीसाठी’ ही केवळ चित्रपटाची टॅगलाईन नाही, तर या संपूर्ण कथेमागची भावना आहे.