मराठी सिनेमाची सामाजिक ताकद: ‘देऊळ बंद २’ मधील बोगस बियाण्यांचा प्रश्न थेट विधानसभेत; आमदार प्रवीण स्वामी यांनी वेधले सरकारचे लक्ष
'देऊळ बंद २' या चित्रपटाने महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपला डंका वाजवला आहे.
बॉक्स ऑफिसवर यशाचे नवनवे (Deool Band 2) विक्रम प्रस्थापित करत १०० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने आता मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन सामाजिक चळवळीचे रूप घेतले आहे. बळीराजाच्या ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटातील अत्यंत महत्त्वाच्या विषयाची थेट महाराष्ट्र विधानसभेत चर्चा झाली असून, सिनेमात मांडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येला लोकप्रतिनिधींनी सभागृहात आवाज दिला आहे.
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटात बोगस बियाणे आणि निकृष्ट दर्जाच्या खतांमुळे शेतकऱ्यांना सहन कराव्या लागणाऱ्या प्रचंड आर्थिक नुकसानीचे आणि मानसिक त्रासाचे वास्तव प्रभावीपणे पडद्यावर मांडण्यात आले आहे. फसवणुकीच्या या दुष्टचक्रामुळे शेतकरी कसा कर्जबाजारी होतो, हा संवेदनशील मुद्दा या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणला. याच सामाजिक मुद्द्याची गंभीर दखल घेत उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार श्री. प्रवीण स्वामी यांनी सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न आक्रमकपणे उपस्थित केला.
विधानसभेत करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
कठोर कायदेशीर कारवाई: बोगस बियाणे आणि निकृष्ट खतांची निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या टोळ्यांवर व कंपन्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
शेतकऱ्यांचे संरक्षण: दरवर्षी हंगामाच्या तोंडावर होणारी बळीराजाची फसवणूक थांबवण्यासाठी शासनाने तातडीने आणि प्रभावी उपाययोजना अमलात आणाव्यात.
सिनेमाचा बॉक्स ऑफिसवरील ऐतिहासिक प्रवास:
वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि मोहन जोशी, स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘देऊळ बंद २’ या चित्रपटाने महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपला डंका वाजवला आहे. अंधश्रद्धा, विज्ञानाची जोड आणि शेतकऱ्यांचा संघर्ष मांडत या चित्रपटाने अवघ्या ५ आठवड्यांत तब्बल ९८ कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवून ‘सैराट’ आणि ‘राजा शिवाजी’ नंतर १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा तिसरा मराठी चित्रपट ठरण्याचा मान मिळवला आहे. चित्रपटाला मिळणारा हा अभूतपूर्व प्रतिसाद आणि त्यातून निर्माण झालेली ही सामाजिक व राजकीय चर्चा हीच मराठी चित्रपटसृष्टीची खरी ताकद असल्याची भावना संपूर्ण सिनेसृष्टीतून व्यक्त होत आहे.