भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट; युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री

एक्सेल एंटरटेनमेंटने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या कथा सादर करत भारतीय सिनेमा आणि ओरिजिनल डिजिटल कंटेंटला जागतिक स्तरावर पोहोचवले आहे.

News Photo   2026 01 05T185035.367

युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (UMG)ची भारतातील शाखा (Film) असलेल्या युनिव्हर्सल म्युझिक इंडिया (UMI)ने आज भारतातील आघाडीच्या चित्रपट व डिजिटल कंटेंट निर्मिती कंपनी एक्सेल एंटरटेनमेंटसोबत करार झाल्याची घोषणा केली. या करारानुसार एक्सेल एंटरटेनमेंटचे मूल्यांकन ₹२,४०० कोटी (अंदाजे €२५७ दशलक्ष) इतके करण्यात आले असून, UMIला कंपनीत ३० टक्के हिस्सेदारी मिळणार आहे. या व्यवहारामुळे UMI आणि एक्सेल यांच्यात नवी धोरणात्मक भागीदारी सुरू होणार असून, यामुळे एक्सेलच्या विस्ताराला चालना मिळेल तसेच भारतीय बाजारात UMIची उपस्थिती अधिक भक्कम होईल.

एक्सेल एंटरटेनमेंटने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या कथा सादर करत भारतीय सिनेमा आणि ओरिजिनल डिजिटल कंटेंटला जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. चित्रपट आणि डिजिटल कंटेंटव्यतिरिक्त, संगीत क्षेत्रातही एक्सेलचा भक्कम अनुभव आहे. विशेषतः *म्युझिकल ड्रामा* हा प्रकार भारतीय बाजारात अत्यंत लोकप्रिय असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळखला जातो. या कराराअंतर्गत, एक्सेलच्या मालकीतील किंवा नियंत्रणाखालील प्रकल्पांसाठी भविष्यात तयार होणाऱ्या सर्व ओरिजिनल साउंडट्रॅक्सचे जागतिक वितरण हक्क UMGकडे असतील. याशिवाय, एक्सेलचे स्वतंत्र म्युझिक लेबल सुरू करण्यात येणार असून, त्याचे जागतिक वितरण UMGकडून केले जाईल.

त्याचबरोबर युनिव्हर्सल म्युझिक पब्लिशिंग ग्रुप हा एक्सेलचा एकमेव म्युझिक पब्लिशिंग भागीदार ठरणार आहे. यामुळे UMG आणि UMIमधील विद्यमान कलाकार व त्यांच्या संगीतसंचाला (repertoire) एक्सेलच्या आगामी प्रॉडक्शन्समध्ये सहभागी होण्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील. या करारानुसार, युनिव्हर्सल म्युझिक इंडिया आणि साउथ आशियाचे अध्यक्ष व सीईओ तसेच आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशिया (AMEA) विभागासाठी स्ट्रॅटेजीचे वरिष्ठ उपाध्यक्ष देवराज सान्याल हे एक्सेल एंटरटेनमेंटच्या संचालक मंडळावर सहभागी होतील. दरम्यान, एक्सेलचे संस्थापक रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर हे पुढेही कंपनीच्या क्रिएटिव्ह दिशा आणि कंटेंटविषयक निर्णयांचे नेतृत्व करत राहतील.

एक्सेल एंटरटेनमेंटचे संस्थापक रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर म्हणाले, “भारतीय मनोरंजन उद्योग सातत्याने वाढत आहे आणि जागतिक स्तरावरील अर्थपूर्ण भागीदारी उभारण्यासाठी हा योग्य काळ आहे. UMGसोबत हातमिळवणी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही भागीदारी अत्यंत सर्जनशील आणि परिवर्तनकारी ठरेल, असा आमचा विश्वास आहे. संगीत, चित्रपट आणि नव्या स्वरूपांमधील कलाकार व त्यांच्या कामासाठी नवे मार्ग खुले होतील. सांस्कृतिक मुळांशी जोडलेल्या आमच्या कथा जगभर पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

कुरळे ब्रदर्सचा ‘नो लेडीज, नो मॅरेज’, नियम मोडायला ‘ती’ आलीये; आयुष्यात लेडीजची एंट्री;

एक्सेल एंटरटेनमेंटचे सीईओ विशाल रामचंदानी म्हणाले, “UMGसोबतची ही भागीदारी आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे कलाकारांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि भारतीय कथा जागतिक दृष्टिकोनातून मांडता येतील. नाविन्य आणि उत्कृष्टतेच्या समान ध्येयासह, एक्सेलला एक जागतिक क्रिएटिव्ह स्टुडिओ बनवण्याचा आमचा मानस आहे, जो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स आणि देशांमध्ये ओरिजिनल व वेगळा कंटेंट सादर करेल.”

UMGचे आफ्रिका, मध्यपूर्व आणि आशिया (AMEA) विभागाचे सीईओ अॅडम ग्रॅनाइट म्हणाले, “आजची घोषणा भारतातील UMGची स्थिती अधिक मजबूत करते. भारत हा आमच्यासाठी वेगाने वाढणारा आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा संगीत बाजार आहे. ओरिजिनल साउंडट्रॅक्स हे भारतातील वेगाने वाढणाऱ्या संगीत बाजाराचा कणा आहेत आणि भारतीय श्रोत्यांमध्ये या प्रकारच्या संगीताची मागणी वाढताना दिसत आहे. एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये गुंतवणूक आणि भागीदारी केल्यामुळे, UMG एक्सेलच्या भविष्यातील प्रकल्पांमध्ये सुरुवातीपासूनच योगदान देऊ शकेल, ज्याचा दोन्ही संस्थांना मोठा फायदा होईल.”

देवराज सान्याल पुढे म्हणाले, “फरहान आणि रितेश यांनी एक अत्यंत प्रभावी व्यवसाय उभारला आहे. त्यांच्या पुढील प्रवासात सहभागी होण्यास आम्ही उत्सुक आहोत. भारतीय चित्रपटसृष्टी संगीत आणि संगीताधारित मनोरंजन व्यवसायासाठी प्रचंड संधी देते आणि एक्सेल हा आमच्यासाठी आदर्श भागीदार आहे.”

ही गुंतवणूक आणि भागीदारी UMGसाठी मोठ्या आणि उच्च क्षमतेच्या संगीत बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्याची अनोखी संधी आहे. IFPIच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारत हा जगातील १५वा सर्वात मोठा रेकॉर्डेड म्युझिक बाजार आहे, तसेच येथे संगीत आणि ऑडिओ-व्हिज्युअल उद्योगांमधील संबंध अतिशय मजबूत आहेत. याशिवाय, भारतात ३७५ दशलक्षांहून अधिक ओटीटी प्रेक्षक चित्रपट, ओरिजिनल शो, क्रीडा स्पर्धा, रिअ‍ॅलिटी शो आणि डॉक्युमेंट्री पाहतात, तसेच ६५० दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. त्यामुळे येत्या काळात या बाजारात मोठ्या प्रमाणावर वाढीची संधी आहे.

इतर संगीत प्रकारांच्या तुलनेत साउंडट्रॅक्स पुन्हा-पुन्हा ऐकले जातात आणि सांस्कृतिक प्रवाह घडवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. अनुभवी आणि यशस्वी चित्रपट व डिजिटल कंटेंट स्टुडिओसोबत भागीदारी केल्यामुळे, UMGला ऑडिओ-व्हिज्युअल प्रकल्प आणि त्यांच्या साउंडट्रॅक्सच्या निर्मितीत सुरुवातीपासूनच सहभाग घेता येईल, तसेच चित्रपट व मालिकांपलीकडे जाऊन उत्कृष्ट दृश्यात्मक कंटेंट घडवण्याचा भाग होता येईल. १९९९ साली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी एक्सेल एंटरटेनमेंटची स्थापना केली. आजवर त्यांनी मिळून ६०हून अधिक मनोरंजन उद्योगातील पुरस्कार पटकावले आहेत. स्टुडिओने ४०पेक्षा अधिक चित्रपट आणि ओरिजिनल सिरीजची निर्मिती केली आहे.

२००१ मधील क्रांतिकारी चित्रपट दिल चाहता है*पासून सुरुवात करत, एक्सेलने नेहमीच सिनेमॅटिक कथाकथनाच्या सीमा विस्तारल्या आहेत. लक्ष्य, तलाश, डॉन, हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., जिंदगी ना मिलेगी दोबारा, फुकरे, दिल धडकने दो आणि गली बॉय यांसारखे गाजलेले चित्रपट एक्सेलच्या नावावर आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या गली बॉयमध्ये भारतातील वाढती हिप-हॉप चळवळ प्रभावीपणे दाखवण्यात आली होती. डिजिटल क्षेत्रातही एक्सेलने आघाडी घेतली असून, Amazon Prime Video साठी भारताची पहिली ओरिजिनल सिरीज इनसाइड एज त्यांनी सादर केली, जी बेस्ट ड्रामा श्रेणीत आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकित झाली होती. त्यानंतर मिर्झापूर, मेड इन हेवन, दहाड आणि अलीकडेच नेटफ्लिक्सवरील डब्बा कार्टेल या सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.

या व्यवहारासाठी AZB & पार्टनर्स यांनी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिले. एर्न्स्ट अँड यंग यांनी एक्सेल एंटरटेनमेंटसाठी, तर KPMG यांनी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपसाठी व्यवहार सल्लागार म्हणून भूमिका बजावली. मॉर्गन स्टॅन्ले यांनी एक्सेल एंटरटेनमेंटसाठी आर्थिक सल्लागार म्हणून काम केले, तर खेतान अँड कंपनी यांनी एक्सेल एंटरटेनमेंटला कायदेशीर सल्ला दिला.

follow us