होर्मुझ सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर इराणचा शुल्क प्रस्ताव; जगाच्या डिजिटल सुरक्षेबाबत चिंता वाढली

समुद्राखाली टाकण्यात आलेल्या इंटरनेट केबल्सच्या ऑपरेटर्सकडून इराणी सागरी क्षेत्रात प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 34 1

Iran proposes tariffs on internet cables : जगभरातील इंटरनेट सेवा, आर्थिक व्यवहार आणि लष्करी दळणवळण यांचा पाया मानल्या जाणाऱ्या समुद्राखालील इंटरनेट केबल्स पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. होर्मूझ समुद्रधुनीतील समुद्राखाली टाकण्यात आलेल्या इंटरनेट केबल्सच्या ऑपरेटर्सकडून इराणी सागरी क्षेत्रात प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव इराण सरकारने मांडला आहे. या प्रस्तावामुळे जागतिक डिजिटल व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

आपण दररोज वापरत असलेले इंटरनेट हे फक्त उपग्रहांवर चालते, असा अनेकांचा समज असतो. मात्र वास्तव वेगळं आहे. जगातील 95 टक्क्यांहून अधिक आंतरराष्ट्रीय डेटा वाहतूक ही समुद्राखालील फायबर ऑप्टिक केबल्समधून होते. जगभरात सध्या समुद्रतळावर 500 हुन अधिक इंटरनेट केबल्सचे जाळे पसरलेले आहे. या केबल्समधून अब्जावधी संदेश, व्हिडिओ कॉल्स, आर्थिक व्यवहार, क्लाउड डेटा आणि सरकारी माहितीची देवाणघेवाण दर सेकंदाला होत असते.

याच पार्श्वभूमीवर इराणने होर्मूझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या केबल ऑपरेटरांकडून शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडल्याने जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. कारण होर्मूझ सामुद्रधुनी ही केवळ तेल वाहतुकीसाठीच नाही, तर डिजिटल दळणवळणासाठी देखील अत्यंत संवेदनशील मार्ग मानली जाते. पश्चिम आशियातील लाल समुद्र, बाब-अल मंदेब सामुद्रधुनी, होर्मूझ सामुद्रधुनी आणि सुएझ कालवा हे केवळ सागरी व्यापाराचे मार्ग नाहीत, तर जागतिक डिजिटल नेटवर्कचे महत्वाचे डिजिटल चोकपॉईंट्स म्हणून देखील ओळखले जातात. याच मार्गांमधून युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडांमधील इंटरनेट नेटवर्क जोडले गेले आहे.

2024 मध्ये तांबड्या समुद्र परिसरात समुद्री केबल्सशी संबंधित काही घटनांमुळे युरोप आणि आशियामधील जवळपास 25 टक्के इंटरनेट सेवांवर परिणाम झाला होता. अनेक कंपन्यांच्या क्लाउड सेवा मंदावल्या, आर्थिक व्यवहारांमध्ये विलंब झाला आणि डेटा ट्रान्सफरवर परिणाम दिसून आला होता. तज्ज्ञांच्या मते, समुद्राखालील या केबल्स आधुनिक जगाची डिजिटल रक्तवाहिनी आहेत. पूर्वी तेलवाहिन्या, बंदरे, रेल्वे किंवा वीज ग्रीड या पायाभूत सुविधांना सर्वाधिक महत्व दिलं जात होतं. मात्र आता डेटा आणि इंटरनेट पायाभूत सुविधा देखील राष्ट्रीय सुरक्षेचा महत्वाचा भाग बनल्या आहेत.

अकरा लढती, आठ संघ अन् प्लेऑफसाठी जोरदार रस्सीखेच ! नेमकी समीकरण आहे तरी कसं ?

आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेत बँकिंग व्यवहार, शेअर बाजार, संरक्षण व्यवस्था, एअर ट्राफिक कंट्रोल, ई-कॉमर्स, सोशल मीडिया, क्लाउड कम्प्युटिंग आणि आर्थिफिशियल इंटेलिजन्स या सर्व यंत्रणा या केबल नेटवर्कवर अवलंबून आहेत. त्यामुळे या केबल्समध्ये व्यत्यय आल्यास त्याचा परिणाम केवळ इंटरनेटपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण जागतिक अर्थकारणावर होऊ शकतो.

समुद्राखालील केबल नेटवर्कमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे केंद्रीकरण. अनेक केबल्स समुद्रतळावर एकाच मार्गाने जातात आणि काही मोजक्या सागरी चेकपॉइंट्समधूनच पुढे सरकतात. त्यामुळे एखाद्या भागात अपघात, युद्धजन्य परिस्थिती, द्रोण हल्ला किंवा जहाजाच्या अँकरमुळे केबल तुटल्यास अनेक देशांमधील इंटरनेट आणि संपर्क व्यवस्था एकाच वेळी प्रभावित होऊ शकते.

विशेष म्हणजे, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियातील विकसनशील देशांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. कारण या देशांकडे पर्यायी डिजिटल पायाभूत सुविधा मर्यादित आहेत. एखादी मुख्य केबल बंद पडल्यास इंटरनेटचा वेग कमी होणे, सेवा खंडित होणे किंवा आर्थिक व्यवहार ठप्प होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

आर्थिक बाजारपेठांवर देखील याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. जागतिक पेमेंट नेटवर्क्स, आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहार, स्टॉक एक्स्चेंज डेटा आणि डिजिटल चलन व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता असते. विमा क्षेत्र, जहाज वाहतूक उद्योग आणि ऊर्जा पुरवठा साखळीवर देखील त्याचे दुरोगामी परिणाम होऊ शकतात.

लष्करी आणि सामरिक पातळीवर देखील या केबल्स अत्यंत महत्वाच्या आहेत. आधुनिक युद्धामध्ये ड्रोन ऑपरेशन्स, उपग्रह नियंत्रण , गुप्तचर माहिती, रसद नियोजन आणि कम्म्युनिकेशन नेटवर्क्स या सर्व यंत्रणा डेटा नेटवर्कवर अवलंबून आहेत. त्यामुळे समुद्राखालील केबल्सची सुरक्षा आता राष्ट्रीय संरक्षण धोरणाचा महत्वाचा भाग बनत आहे.

जग अधिकाधिक डिजिटल होत असताना समुद्रखालील इंटरनेट केबल्सचे महत्व झपाट्याने वाढत आहे. मात्र त्याच वेळी या अदृश्य पायाभूत सुविधांवरील धोके देखील वाढत आहेत. इराणच्या प्रस्तावामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं आहे की, भविष्यातील संघर्ष केवळ जमिनी, समुद्र किंवा आकाशातच नाही, तर डेटा आणि डिजिटल नेटवर्क्सभोवती देखील फिरणार आहेत.

follow us