26/11 Mumbai Attacks : ‘इस्त्रायल’चा मोठा निर्णय! ‘लष्कर ए तैयबा’ आतंकवादी संघटना घोषित
26/11 Mumbai Attacks : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी (26/11 Mumbai Attacks) हल्ला कुणीच विसरणार आहे. आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात या अतिरेकी हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. जागतिक पातळीवर या हल्ल्याचा वेळोवेळी निषेध करण्यात आला आहे. आता ‘हमास’ (Hamas) या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने (Israel) एक मोठी घोषणा केली आहे. 26/11 हल्ल्याच्या पंधराव्या वर्षपूर्ती आधीच इस्त्रायलने ‘लष्कर ए तैयबा’ संघटनेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. भारतातील इस्त्रायलच्या दूतावासाने स्पष्ट केले की मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पंधराव्या वर्षपूर्ती आधी इस्त्रायलने लष्कर ए तैयबा संघटनेला दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले आहे.
यासंदर्भात सगळी कागदपत्रे तयार केली आहेत. त्यानंतर ही कट्टर संघटना इस्त्रायलच्या अवैध दहशतवादी संघटनांच्या यादीत सहभागी झाली आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारने अशी कोणतीच विनंती इस्त्रायल सरकारला केली नव्हती. तरी देखील इस्त्रायलने ही कारवाई केली. मुंबई दहशतवादी हल्ल्यांच्या आठवणी 15 व्या वर्षाच्या प्रतिकाच्या रुपात इस्त्रायलने लष्कर ए तैयबाला दहशतवादी संघटनेच्या रुपात नोंदणीकृत केले.
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये लष्कर ए तैयबाच्या दहा आतंकवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवत गोळीबार केला होता. या घटनेनंतर अवघ्या जगात प्रचंड खळबळ उडाली होती. या आतंकी हल्ल्यात तब्बल 166 लोकांचा मृत्यू झाला होता तसेच 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. हा हल्ला तीन दिवस म्हणजेच 29 नोव्हेंबरपर्यंत सुरू होता. प्रत्युत्तरात नऊ दहशतवादी ठार झाले होते. तर एका जणाला जिवंत पकडण्यात आले होते. नंतर त्या कसाब नावाच्या दहशतवाद्यास फाशी देण्यात आली होती. या हल्ल्यात इस्त्रायलच्या नागरिकांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे या हल्ल्याचा इस्त्रायलनेही तीव्र शब्दांत निषेध केला होता.