Mohammed Shami : कोलकाता न्यायालयाचा क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा धक्का

Mohammed Shami : कोलकाता न्यायालयाचा क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा धक्का

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami) कोलकाता न्यायालयाकडून (Kolkata Court) मोठा धक्का देण्यात आलाय. मोहम्मद शमीला त्याची विभक्त पत्नी हसीन जहाँला (Hasin Jahan) महिन्याला 1 लाख 30 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ कायम कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. शमीसोबत झालेल्या वादामुळं हसीन जहाँ अनेक दिवसांपासून आपल्या मुलीसोबत वेगळी राहते. हसीन जहाँ व्यवसायानं अभिनेत्री आहे.

शमीकडून 1 लाख 30 हजार रुपयांपैकी 50 हजार रुपये हसीन जहाँसाठी वैयक्तिक पोटगी असेल आणि उर्वरित 80 हजार रुपये तिच्यासोबत राहणाऱ्या तिच्या मुलीच्या देखभालीसाठी असणार असल्याचंही यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलंय.

2018 मध्ये, हसीन जहाँनं 10 लाख रुपयांच्या मासिक पोटगीची मागणी करत कोर्टात दावा दाखल केला होता. त्यापैकी 7 लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि उर्वरित 3,00,000 रुपये तिच्या मुलीच्या देखभालीसाठी खर्च केले जातील, असंही कोर्टानं सांगितलं.

हसीन जहाँच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला माहिती दिली की, भारतीय वेगवान गोलंदाजाच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या आयकर रिटर्ननुसार, त्या आर्थिक वर्षासाठी त्याचे वार्षिक उत्पन्न 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं आणि त्यावर आधारित मासिक पोटगीची मागणी केली होती.

त्यामुळं हसीन जहाँनं मागितलेली 10 लाखांची पोटगी अवाजवी नव्हती. मोहम्मद शमीचे वकील सेलिम रहमान यांनी दावा केलाय की, हसीन जहाँ स्वतः व्यावसायिक फॅशन मॉडेल म्हणून काम करत असून स्थिर उत्पन्न मिळवत असल्यानं, त्यांची उच्च पोटगीची मागणी योग्य नव्हती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube