खलिस्तानी दहशतवादाला आणखी एक दणका! ‘शीख फॉर जस्टिस’चा म्होरक्या पन्नुनची भारतातील मालमत्ता जप्त
India vs Canada : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या हत्येचा कट भारताने रचला असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Prime Minister Justin Trudeau) यांनी केला आहे. यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवाय कॅनडाच्या नागरिकांना अनिश्चित काळासाठी भारताचा व्हिसा देणे थांबविले आहे.
या दरम्यान, भारताने कॅनडाला आणखी एक दणका दिला आहे. कॅनडातील ‘शीख फॉर जस्टिस’ संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नून (Gurpatwant Singh Pannu) याच्या मालकीची भारतातील मालमत्ता बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत जप्त केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पन्नूनची चंदीगड आणि अमृतसरमधील ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे.चंदीगडमधील सेक्टर 15 येथील पन्नूनच्या निवासस्थानाबाहेर मालमत्ता जप्तीची नोटीस चिकटवलेली आहे. (National Investigation Agency (NIA) has confiscated the properties owned by Gurpatwant Singh Pannun)
हिंदूंनो, कॅनडा सोडून भारतात जा; खलिस्तानी-दहशतवाद्याने कॅनडास्थित भारतीयांना धमकावलं
या नोटिसीत म्हटल्याप्रमाणे, “घर क्र. 2033 सेक्टर 15-सी, चंदीगड, गुरपतवंत सिंग पन्नू याच्या मालकीचे घर आहे. गुरपतवंत सिंग पन्नू हा राष्ट्रीय तपाय संस्थेच्या प्रकरण RC- 19/2020/NIA/DLI ‘घोषित गुन्हेगार’ आहे. त्यामुळे बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायद्याच्या कलम 33(5) अंतर्गत ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 1967 NIA विशेष न्यायालय, SAS नगर, मोहाली, पंजाब, दिनांक 14/09/2023 च्या आदेशानुसार, असं यात सांगितले आहे.
यापूर्वीही गुरपतवंत सिंग पन्नून याच्या अमृतसरमधील खानकोट या वडिलोपार्जित गावातील शेतजमिनीवरही अशीच नोटीस लावण्यात आली होती. 2020 मधील एका दहशतवादी प्रकरणात केंद्रीय तपास संस्थेने पन्नूच्या गावातील 46 कनाल शेतजमीन जप्त केली आहे. पन्नूनचे वडील मोहिंदर सिंग पन्नू फाळणीपूर्वी तरनतारनमधील पट्टी उपविभागातील नाथू चक गावचे रहिवासी होते. फाळणीनंतर हे कुटुंब अमृतसरच्या खानकोट गावात स्थलांतरित झाले.
NIA च्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमधील खलिस्तान्यांना मदत करणाऱ्या गँगस्टर सुखदूल सिंगचा खात्मा
गुरपतवंत सिंग पन्नून हा फूटीरतावादी गट शीख फॉर जस्टिस (SFJ) च्या संस्थापकांपैकी एक आहे. अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये राहून खलिस्तान चळवळ जिवंत ठेवण्याचे काम ही संघटना करते. जुलै 2020 मध्ये, केंद्रीय गृह मंत्रालयाने पन्नूनला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. पन्नून भारताविरुद्ध मोहीम चालवत असून त्याच्या मूळ राज्य पंजाबमधील शीख तरुणांना दहशतवादात सामील होण्यास प्रवृत्त करत आहे, असा त्याच्यावर आरोप आहे.
याच शिख फॉर जस्टिस’ने 2022 मध्ये कॅनडात स्वतंत्र खलिस्तानबाबत सार्वमत आयोजित केलं होतं. खलिस्तानच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या सार्वमतात एक लाख लोक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला होता. या आयोजकांमध्ये पन्नुनही एक असल्याचा दावा आहे. त्याने हरदीपसिंग निज्जर याच्यासोबतही जवळून काम केले आहे.